अंबाजोगाई (प्रतिनिधी) : दिल्लीतील जंतर-मंतर येथे शांततामय मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर आणि ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ मा. सोनम वांगचुक यांच्या उपोषणस्थळी पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ ‘संविधान प्रेमी विधिज्ञ वकील संघ, अंबाजोगाई’च्या वतीने तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करावी आणि दोषींवर कडक कारवाई करावी, या मुख्य मागणीचे निवेदन महामहिम राष्ट्रपती यांच्या नावे अंबाजोगाईच्या उप-विभागीय अधिकाऱ्यांमार्फत सादर करण्यात आले.
देशात सातत्याने होणाऱ्या पेपरफुटीमुळे हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागले असून, नैराश्यातून अनेक तरुणांना टोकाचे पाऊल उचलावे लागले आहे. यावर आळा घालण्यासाठी, शैक्षणिक सुधारणांसाठी आणि केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीतील जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांनी अहिंसक मार्गाने आंदोलन छेडले होते. या आंदोलनाला पाठिंबा देत ख्यातनाम शास्त्रज्ञ व पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांनीही बेमुदत उपोषण सुरू केले होते.
मात्र, दि. २६ जून रोजी शांततामय मार्गाने मोर्चा काढणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी बेछूट लाठीमार केला. या हिंसक हल्ल्यात अनेक तरुण-तरुणी रक्तबंबाळ झाले असून काहींचे हात-पाय मोडल्याच्या गंभीर घटना घडल्या आहेत. लोकशाही मार्गाने आवाज उठवणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या या हल्ल्याचा देशभरातून निषेध होत आहे.

निवेदनातील प्रमुख मागण्या
जंतर-मंतरवर विद्यार्थी आणि आंदोलनकर्त्यांवर झालेल्या लाठीहल्ल्याची निष्पक्ष व उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
देशातील वाढत्या पेपरफुटीची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा.
भविष्यात विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी भारतीय शिक्षण व्यवस्थेत पारदर्शक आणि व्यापक सुधारणा तातडीने लागू कराव्यात.
कायद्याचे अभ्यासक आणि संविधानाचे रक्षक म्हणून या अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे आमचे कर्तव्य असल्याचे सांगत, महामहिम राष्ट्रपतींनी या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी ‘संविधान प्रेमी विधिज्ञ वकील संघ, अंबाजोगाई’च्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. निवेदनावर adv अजय बुरांडे, adv. बाबुराव तिडके, adv माणिक आदमाने,adv माधव जाधव,adv इस्माईल गवळी, adv विलास लोखंडे, adv शिवाजी कांबळे,adv विजय चव्हाण, adv दिलीप गोरे, adv सचिन शेप यांच्यासह आदींची उपस्थिती होती.
