*राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे निवेदन ; मोर्चात महाविकास आघाडीतील घटक पक्ष सहभागी*
अंबाजोगाई प्रतिनिधी:-
केज विधानसभा मतदारसंघासह संपूर्ण बीड जिल्ह्यात पावसाअभावी नुकसान झालेल्या खरीप पिकांचे तातडीने पंचनामे करून प्रति हेक्टर 50,000 रूपये आर्थिक मदत देण्यात यावी तसेच बीड जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून आवश्यक दुष्काळाच्या सर्व उपाययोजना लागू करण्यात याव्यात, या मागणीसाठी मंगळवार, दिनांक 1 सप्टेंबर 2026 रोजी उपजिल्हाधिकारी यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. हा मोर्चा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष राजसाहेब देशमुख व माजी आमदार पृथ्वीराज साठे यांच्या नेतृत्वात काढण्यात आला. या मोर्चात महाविकास आघाडीतील विविध घटक पक्ष सहभागी झाले होते. असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष अमर देशमुख यांनी दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने उपजिल्हाधिकारी, अंबाजोगाई यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अपुऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांवर गंभीर आर्थिक संकट ओढवले असून, अनेक भागांमध्ये पिकांची वाढ खुंटली आहे. तसेच पिके करपुन गेलेली आहेत. संपूर्ण बीड जिल्ह्यातील पावसाची परिस्थिती व खरीप पिकांचे झालेले नुकसान लक्षात घेऊन जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून दुष्काळ निवारणाच्या सर्व आवश्यक उपाययोजना तातडीने लागू करण्यात याव्यात. दुष्काळग्रस्त भागात पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा व पाण्याची व्यवस्था करण्यात यावी तसेच मजुरांच्या हाताला काम देण्यात यावे. दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली असून, त्यांच्या कृषी वीज बिलात सवलत देऊन थकीत वीज बिलाच्या वसुलीस तात्पुरती स्थगिती देण्यात यावी. तसेच दुष्काळाच्या काळात शेतकऱ्यांची वीज जोडणी तोडू नये व शेतीसाठी आवश्यक वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यात यावा. या परिस्थितीचा परिणाम ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांवरही होत आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्त कुटुंबातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक फी व परीक्षा शुल्क माफ करण्यात यावी व शिष्यवृत्ती तसेच आवश्यक शैक्षणिक मदत उपलब्ध करून देण्यात यावी. तसेच दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन ग्रामीण भागातील ग्रामस्थांना रोजगाराच्या अतिरिक्त संधी उपलब्ध करून देण्यात याव्यात. सद्य:स्थितीचे गांभीर्य लक्षात घेता या सर्व बाबींवर तातडीने सर्व उपाययोजना लागू करण्यात याव्यात व तात्काळ अंमलबजावणी करावी अन्यथा येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. हा मोर्चा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष राजसाहेब देशमुख व माजी आमदार पृथ्वीराज साठे यांच्या नेतृत्वात काढण्यात आला. या मोर्चात महाविकास आघाडीतील विविध घटक पक्ष वाळलेल्या सोयाबीनच्या पेंढ्या घेऊन, मागणीच्या गगनभेदी घोषणा देत सहभागी झाले होते. असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष अमर देशमुख यांनी दिली. निवेदन देताना माजी आमदार पृथ्वीराज साठे, राजेसाहेब देशमुख, तालुकाध्यक्ष अमर देशमुख, शिवसेना गटाचे मदनलाल परदेशी, अशोक हेडे, संजय किसनराव भोसले, नगरसेवक ऍड.विकास काकडे, नगरसेवक मालू जोगदंड, तारेख अली उस्मानी, अमृता काळदाते, ऍड.इस्माईल चौधरी, हणुमंत मोरे, तानबा लांडगे, प्रमोद भोसले, हमीद चौधरी, नसरीन बागवान, चंद्रकला देशमुख, लखन चामनर, केशव ढगे, बाळासाहेब कदम, संतोष चव्हाण, ज्योतिराम पवार, सतिश पवार, गजानन निकते, भिसे, अमोल देशमुख, सुधाकर जोगदंड यांच्यासह मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना (उबाठा) पक्ष आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
