शेतकरीपुत्र ॲड. शंकर चव्हाण ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसऱ्या आघाडीच्या संपर्कात ?
परळी वैजनाथ | प्रतिनिधी :
विधानसभेच्या निवडणुकाचे नामांकन अर्ज आजपासून भरायला सुरुवात होत आहे. २९ तारखेपर्यंत फॉर्म भरण्याची शेवटची तारीख असल्यामुळे बऱ्याच पक्षाकडून उमेदवारी अंतिम होण्याचे बाकी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार यांची २४ सप्टेंबरला ॲड. शंकर चव्हाण यांनी परळी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी यासाठी भेट घेऊन त्याबाबत चर्चा केली होती. मात्र अद्याप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट यांच्याकडून आजतागायत कोणत्याही इच्छुक उमेदवारास उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही, त्यामुळे इच्छुक उमेदवारांची धांदल उडाली आहे. महाराष्ट्रातील तिसरी आघाडी म्हणजे ‘परिवर्तन महाशक्ती’. ही तिसरी आघाडी छत्रपती संभाजी महाराज, बच्चू कडू तसेच राजू शेट्टी व इतर पक्षांनी मिळून तयार केलेली ही तिसरी आघाडी परिवर्तन महाशक्ती म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेत आहे. या आघाडीच्या वतीने ॲड. शंकर चव्हाण निवडणूक लढतील? अशी सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. ॲड. शंकर चव्हाण हे परिवर्तन महाशक्ती तिसऱ्या आघाडीच्या संपर्कात असल्याची एकूणच मतदारसंघात चर्चा सुरु आहे. तिसऱ्या आघाडीची निर्मिती झाल्यामुळे व इतर अनेक पक्ष स्वबळावर लढण्याच्या अनेक चर्चेला उधाण आलं असल्यामुळे मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाला आहे. यंदाची निवडणूक महाराष्ट्रासाठी खूप कठीण निवडणूक असेल असे यावरून लक्षात येते. याचे कारण उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात झाली असल्यामुळे त्याचा फटका नक्कीच निवडणूक आयोगाला निवडणूक प्रक्रिया दरम्यान बसणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही. उमेदवार जास्त म्हणजे कामही जास्त, त्यामुळे निवडणूक आयोगाची ऐनवेळी धांदल उडण्याची शक्यता आहे. २९ तारखेला अर्ज भरण्याची शेवट तारीख आहे व त्यानंतर अर्ज काढून घेण्याची तारीख ४ नोव्हेंबर २०२४ ला असल्यामुळे दरम्यान किती उमेदवार अर्ज भरतील व किती उमेदवार अर्ज मागे घेतील याचं गणित लावणं सध्या तरी अशक्य वाटते. परळी विधानसभा मतदारसंघ हा महाराष्ट्राच्या राजकारणात व बीड जिल्ह्यातला अतिशय संवेदनशील मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. मराठा आरक्षणाासाठी लढा दिलेले मनोज जरांगे पाटील यांच्यामुळे सर्व जिल्हयातून सर्वांनी मिळून खासदार बजरंग सोनवणे यांना निवडून दिले होते पण आता या विधानसभेला हा पॅटर्न कितपत लागू पडेल हे येणारा काळच ठरवेल. त्यामुळे येणाऱ्या काळात मतदार कोणाला निवडून देतील व कोणाच्या बाजूने विजयाची पथक फडकेल हे सांगणे सध्या तरी कठीण आहे. परळी विधानसभा मतदारसंघांमध्ये नवीन उमेदवाराला निवडून द्यायचं असा सूर निघत असल्यामुळे नवीन चेहऱ्याला पसंती मिळेल असं एकूणच चित्र तयार झालं आहे. असं झालं तर घराणेशाहीला ब्रेक बसेल व लोकशाही जिवंत आहे असे वाटेल, कारण मतदार संघाचा विकास करायचा असेल तर सक्षम उमेदवार हा लोकप्रतिनिधी असायला हवा आणि मतदारसंघाचा सर्वांगिण विकास करायचा असेल तर परिवर्तन व्हायला हवं. यामुळेच ॲड. शंकर चव्हाण हे परिवर्तन महाशक्तीच्या दिशेने जातील का ? हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे.