शरीरासोबतच बुद्धी व मन सुदृढ असेल तर यश हमखास मिळतेच- सतीश बलुतकर
अंबाजोगाई (प्रतिनिधी):-
शरीरासोबतच मनुष्याची बुद्धी व मन सुदृढ असेल तर यश हे हमखास मिळतेच अशी भावना क्रीडा शिक्षक सतीश बलुतकर यांनी व्यक्त केली. ते सोमवार दि २ डिसेंबर रोजी श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित जोधाप्रसादजी मोदी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या इ. ५वी ते ९वी इयत्तांच्या वार्षिक किडा महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. याप्रसंगी शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.या क्रीडा स्पर्धेची सुरुवात हॉकीचे जादुगार मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
दरवर्षी विद्यार्थी या स्पर्धाची आवर्जुन वाट पहात असतात. या वार्षिक क्रीडा स्पर्धा महोत्सवात इ ५ वी ते ९ वी च्या विद्यार्थ्यांच्या धावणे, रिलेरेस, थैला रेस, संगीत खुर्ची, दोरीवरील उडया, कब्बडी त्याचबरोबर खो खो या खेळासह विविध क्रीडा प्रकारांच्या स्पर्धा होणार आहेत. या क्रीडा स्पर्धेचे प्रास्ताविक क्रीडा विभाग प्रमुख गायके एन. के. यांनी केले. आतापर्यंत संस्थेतील विद्यार्थ्यांनी तालुका, जिल्हा, राज्य आणि राष्टीय पातळीवरील विविध क्रीडा स्पर्धेत उज्वल यश संपादन करतांना आपल्या संस्थेसोबतच शिक्षक तथा पालकांचे नाव उज्वल केले आहे असल्याचे आपल्या प्रास्ताविकामधुन गायके नानासाहेब यांनी सांगितले.
या कार्यक्रम प्रसंगी उद्घाटक सतिश बलुतकर यांनी आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आजच्या मोबाईलच्या काळात सर्वच वयातील विद्यार्थ्यांनी मैदानी खेळासाठी दररोज वेळ देण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.विज्ञान तंत्रज्ञान हे आजच्या युगात माणसाचे अविभाज्य घटक बनले असले तरी मैदानी खेळ देखील तेवढाच महत्वाचा असून त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नसल्याचे बलुतकर यांनी याप्रसंगी नमूद केले.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शाळेतील संगीत शिक्षक सिनगारे एस.डी.यांनी केले तर किडा स्पर्धेचे प्रमुख कांबळे आर.एस. आणि पंच म्हणुन पाळेकर यु.ए. यांनी आपली भुमिका बजावली. स्पर्धेचे निकालपत्रक लिहण्याची जवाबदारी श्रीमती गजभिये डी.डी. यांनी चांगल्या पध्दतीने पार पाडली. शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी किडा स्पर्धा यशस्वी होण्याकरीता सहकार्य केले.