संतोष देशमुख हत्येने राज्यात बीड जिल्हा गाजत असताना परळी नगरपालिकेत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा राडा; कर्मचाऱ्यास कॅबिनमध्ये घुसून केली मारहाण
परळी वैजनाथ (प्रतिनिधी)
संतोष देशमुख यांच्या हात्येने राज्य भरात बीड जिल्हा गाजत असताना आणि या प्रकरणी मा ना धनंजय मुंडे यांच्यावर कमालीचा मानसिक तणाव असतानाच आज परळी शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस च्या एका नगरसेवकाने प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांचा हप्ता का जमा करत नाहीस असे म्हणून नगरपालिकेचे कर्मचारी सिद्धार्थ गायकवाड यांना जातीयवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार आज घडला
यावेळी त्यांच्या सोबतच्या कार्यकर्त्यांनी कर्मचाऱ्यास कॅबिनमध्ये घुसून मारहाण केली. या प्रकाराने संतप्त कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले. दरम्यान, याप्रकरणी गायकवाड यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात माजी नगरसेवक अन्वर मिस्किन शेख यांच्यासहित तिघांच्याविरुद्ध दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला.
परळी शहरातील पेठ मोहल्ला, राहुल नगर, कुरेशी नगर येथील घरकुल आवास योजनेच्या लाभार्थ्यांना घरकुले मंजूर झाली परंतु त्याचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाला नाही. याचा जाब विचारण्यासाठी परळीतील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) माजी नगरसेवक अन्वर मिस्कीन व काही कार्यकर्ते परळी नगरपालिकेत आले. उपमुख्यअधिकारी यांच्या टेबल जवळ बसले तेथेच नपचे घरकुल विभागातील कर्मचारी गायकवाड आणि माजी नगरसेवक तसेच सोबतच्या कार्यकर्ते यांच्यात शाब्दिक चकामक झाली. त्यानंतर कार्यकर्ते आक्रमक होऊन घरकुल विभागाचे इन्चार्ज अधिकारी सिद्धार्थ गायकवाड यांच्या अंगावर धावून गेले. यावेळी काही कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण ही केली.
वाद वाढल्याचे पाहून परळी नगरपालिकेचे उपमुख्य अधिकारी संतोष रोडे, नाव नोंदणी विभागाचे किरण उपाडे व जन्म नोंद विभागाचे श्री विकास जगतकर यांनी मध्यस्थी करत माजी नगरसेवकासह कार्यकर्त्यांना आवर घातला. कर्मचाऱ्यास मारहाण झाल्याच्या प्रकारावर संताप व्यक्त करत नगरपालिका कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले. तसेच शहर पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी धाव घेतल्याचे वृत्त आहे.