स्त्रीयांसाठी शैक्षणिक विश्वाची दारे खुली करून त्यांचे अंधकारमय आयुष्य सावित्रीबाई फुले यांनी खऱ्या अर्थाने प्रकाशमय केले- सुनीता मोदी
*ज्ञानाई सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले महिला पतसंस्थेच्या वतीने विनम्र अभिवादन*
अंबाजोगाई(प्रतिनिधी):- स्त्रीयांच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने शैक्षणिक विश्वाचे द्वार उघडून त्यांचे अंधकारमय आयुष्य क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी खऱ्या अर्थाने प्रकाशमय केल्याची भावना क्रांतीज्योती सावित्रीमाई फुलें महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षा सुनीता राजकिशोर मोदी यांनी व्यक्त केली. त्या पतसंस्थेच्या वतीने सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करतांना बोलत होत्या. यावेळी पतसंस्थेच्या संचालिका श्रीमती शोभा खडकभावी, सुरेखा खंडाळे, सविता रापतवार , अंजली मस्के तसेच उषा मसने या उपस्थित होत्या. कार्यक्रमात सर्वप्रथम ज्ञानाई क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार व पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
सावित्रीमाईच्या जीवनावर प्रकाश टाकताना पतसंस्थेच्या अध्यक्षा सुनीता राजकिशोर मोदी सांगितले की देशातील महिलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांना शिक्षण रुपी पंख देण्याचे पवित्र कार्य क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांनी केले. क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांची भारताच्या इतिहासावर अमीट छाप आहे . क्रांतीज्योती सावित्रीमाई यांनी दिन , दलित , शोषित महिलांसाठी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत देखील शिक्षणाचे द्वार खुले केले. त्यांना शैक्षणिक बळ देण्याचे श्रेय माता सावित्रीमाई फुले यांनाच जाते . अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्त्री शिक्षणाचा प्रारंभ करण्याचे धाडस ज्योतिबा फुले यांच्या सहकार्याने सावित्रीमाई फुले यांनी दाखवले . सावित्रीबाई यांचा आदर्श समोर ठेवूनच आजची नारी समाजात वावरताना दिसत असल्याचे सुनीता राजकिशोर मोदी यांनी सांगितले .
क्रांतीज्योती सवित्रीमाईं फुले यांनी त्या काळातील मुली , महिला यांना चूल आणि मूल या जोखडाच्या चौकटीतुन बाहेर काढण्यासाठी आपले आयुष्य खर्च केले. यासाठी त्यांना आपल्याच समाजाकडून अनेक संकटांना सामोरे जावे लागले. मात्र सावित्रीमाईंनी येणाऱ्या संकटांना धैर्याने सामोरे जाऊन स्त्रियांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. त्यांच्याच शिकवणी व आदर्शांना समोर ठेवूनच आपणही आपले कार्य करण्याचे आवाहन श्रीमती सुनीता मोदी यांनी याप्रसंगी केले.
याप्रसंगी पतसंस्थेच्या संचालिका सुरेखा खंडाळे यांनी देखील सावित्रीबाई फुले यांच्या जीवनपट उलगडला. जेव्हा सावित्रीबाई फुले यांनी हातात पुस्तक घेऊन शाळेकडे जात असताना मनुवाद्यांनी सावित्रीबाई यांच्या अंगावर चिखल, शेण फेकून कुत्सित भावनेने पाहिले. त्याच्यावर दगडफेक देखील करण्यात आली. मात्र अशाही परिस्थितीत सावित्रीबाई या डगमगल्या नाहीत. मला माझ्या आया बहिणींना या कर्मठ दुनियेतुन बाहेर काढून त्यांना शिक्षित करण्याचा चंग बांधला होता.त्यांना याकामी महात्मा ज्योतिबा फुले यांची मोलाची साथ मिळाल्याचे श्रीमती सुरेखा खंडाळे यांनी याप्रसंगी नमूद केले. याप्रसंगी श्री योगेश्वरी मल्टिस्टेट चे व्यवस्थापक संतोष ढगे आणि सावित्रीमाई फुले महिला पतसंस्थेचे व्यवस्थापक सागर कंगळे हे उपस्थित होते.