जातीयवादी मनोज जरांगेंवर गुन्हा दाखल करा; परळीत मुंडे समर्थकांचे पोलिस स्टेशन समोर ठिय्या आंदोलन
परळी (प्रतिनिधी)
परभणी येथे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणी न्याय मागण्यासाठी निघालेल्या सर्वपक्षीय आक्रोश मोर्चात मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री धनंजय मुंडे यांना राज्यात फिरू देणार नाही, अशा इशारा दिल्या नंतर याचे पडसाद आज परळीत उमटले असून धनंजय मुंडे समर्थकांनी परळी शहर पोलिस स्टेशनसमोर जरांगे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी करत आंदोलन केले.
जाती जातीत तेढ निर्माण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी करताच त्यांच्या धिक्कारांच्या घोषणाही यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिल्या. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फासावर लटकवा आणि देशमुख कुटुंबाला न्याय द्या, या मागणीसाठी काल परभणीत सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात आला. यावेळी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांचे नाव या हत्ये प्रकरणात सापडले तर त्यांना राज्यात फिरू देणार नाही, असा इशारा आपल्या भाषणात दिला होता.
या विरोधात आज परळी शहर पोलीस ठाण्यासमोर धनंजय मुंडे समर्थकांनी निदर्शने करत जोरदार घोषणाबाजी केली. जाती-जातीत तेढ निर्माण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा, जातीयवादी जरांगेंचे करायचे काय, जाती जातीत तेढ निर्माण करणाऱ्या जरांगेंचा धिक्कार असो, अशा घोषणा यावेळी आंदोलकांनी दिल्या. संतोष देशमुख हत्याप्रकरणी परभणी इथं निघालेल्या मोर्चात मनोज जरांगे यांनी मंत्री धनंजय मुंडे यांचे नाव घेत, थेट इशारा दिला होता. ‘संतोषभैय्याच्या हत्येत थोडा जरी सापडला, तरी मंत्री धनंजय मुंडेंना राज्यात फिरू देणार नाही’,असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला होता. धनंजय देशमुख गुरूवारी पोलिस ठाण्यात गेले होते. त्यावेळी त्यांना काहींनी धमकावले याचा उल्लेख करत मनोज जरांगे यांनी थेट मंत्री धनंजय मुंडे यांना इशारा दिला. ‘देशमुख कुटुंबियांच्या केसाला जरी धक्का लागल्यास, धनंजय मुंडे यांना रस्त्याने फिरू देणार नाही. इथं माणसांची मुडदे पडायला लागली आहेत. लेकरं उघडण्यावर पडायला लागलीत. आणि हे लोकं मारणाऱ्यांना घरात संभाळत आहेत’,असा आरोप जरांगे पाटील यांनी केला होता तसेच धमक्या देऊन हल्ले करणार असाल तर जशास तसे उत्तर दिले जाईल, परभणी व धाराशिव जिल्ह्यातील आमचे माणसे घरात घुसून मारतील, अशी धमकी जरांगे पाटील यांनी थेट धनंजय मुंडे यांचे नाव घेऊन दिली होती. जरांगे यांच्या या इशाऱ्यानंतर त्यांच्या समर्थकांमध्ये संताप आहे. आज परळी शहर पोलिस स्टेशनसमोर जमत धनंजय मुंडे समर्थक आक्रमक झाले होते. जरांगे पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहिल, अशी भूमिका धनंजय मुंडे समर्थक आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे.