अंबाजोगाई

आएएस’ अर्पिता ठुबे ॲक्शन मोडवर : बोगस नळ कनेक्शनवर कारवाईचा बडगा, अतिक्रमणांवर पडणार हातोडा, वाचा

अंबाजोगाई प्रतिनिधी:- आएएस’ अर्पिता ठुबे यांनी अंबाजोगाई नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पदाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर नगरपरिषद प्रशासनावर पकड मजबूत केली आहे. नगरपरिषद प्रशासनात‌ सुसुत्रता आणल्यानंतर अर्पिता ठुबे यांनी आपला मोर्चा शहरातील बोगस नळ कनेक्शन आणि बेकायदेशीर फ्लेक्सकडे वळवला आहे. अंबाजोगाई शहरात आज‌ त्यांनी मोहिम राबवून असंख्य बोगस नळ कनेक्शन तोडले आहेत आणि काही नियमित केले आहेत. नगरपरिषद टीमला घेऊन ‘आएएस’ अर्पिता ठुबे यांनी सकाळपासून ही मोहीम बहुतांश वस्त्यात राबविली.

अंबाजोगाई नगरपरिषदेत ‘आएएस’ अर्पिता ठुबे या प्रशिक्षणार्थी मुख्याधिकारी म्हणून दिनांक 25 डिसेंबरपासून रुजू झाल्या आहेत. रुजू झाल्यापासून अर्पिता ठुबे यांनी कामाचा सपाटा लावला आहे. नगरपरिषदेत आलेल्या सर्वसामान्य नागरिकांची कामे जलदगतीने व्हावी आणि प्रशासनात सुसुत्रता आणि पारदर्शकता असावी, यावर त्यांचा अधिक भर आहे. प्रशासनात रोजचा दिवस महत्वाचा हे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून अर्पिता ठुबे सध्या नगरपरिषदेत कामकाज करीत आहेत.‌ त्यांच्या काम करण्याच्या पध्दतीमुळे नगरपरिषद प्रशासनात‌ चागंलेच‌ बदल दिसून येत आहेत.

अंबाजोगाई नगरपरिषदेच्या हद्दीतील बोगस नळ कनेक्शन, बेकायदेशीर फ्लेक्स आणि अतिक्रमणे यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी ‘आएएस’ अर्पिता ठुबे यांनी पावलं उचलली आहेत.‌ बोगस नळ कनेक्शन वैध करुन घ्यावीत नसता ती तोडली जातील, असा इशाराच त्यांनी स्थानिक वर्तमानपत्रातून काही दिवसांपूर्वी दिला होता.‌ त्याचाच भाग म्हणून अर्पिता ठुबे यांनी आज थेट रस्त्यावर उतरत कारवाईचा बडगा उगारला. अर्पिता ठुबे आणि नगरपरिषद टीमने शहरातील बोगस नळ कनेक्शनवर कारवाई करत संबंधितांकडून दंडही वसूल केला आहे.

*बॅनरबाजीवर आणि अतिक्रमणावर कारवाई करणार*

अंबाजोगाई शहरात मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी आणि अतिक्रमण होत आहे. याला आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलली जात आहेत. ‘आएएस’ अर्पिता ठुबे यांनी यापुढे शहरात बॅनर लावण्यासाठी नगरपरिषदेची परवानगी देणार नसल्याचे सांगितले आहे, तशा राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचना असल्याचेही त्यांनी सांगितले. शहरातील अतिक्रमणाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, अतिक्रमण काढण्यासाठी लवकरच मोहीम हाती घेणार आहोत, तशा आशयाच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!