अखिल भारतीय जायस्वाल सर्ववर्गीय महासभेच्या दहाव्या महाधिवेशनाचे ११ व १२ जाने रोजी अंबाजोगाईत आयोजन
*देशभरातील विविध मान्यवर या दहाव्या महा अधिवेशनात होणार सहभागी*
अंबाजोगाई (प्रतिनिधी):- अखिल भारतीय जायसवाल सर्ववर्गीय महासभेचे दहावे दोन दिवसीय राष्ट्रीय महाधिवेशन दि ११ व १२ जानेवारी दरम्यान अंबाजोगाई शहरात संपन्न होणार असल्याचे संयोजक राजकिशोर मोदी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे. शहरातील मोदी लर्निंग सेंटर येथे हे दोन दिवशीय महाअधिवेशन संपन्न होणार असून या महाधिवेशनास देशभरातून विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या महा अधिवेशनात पहिल्या दिवशी (दि ११) रोजी महासभेची विशेष महाबैठक संपन्न होणार असून दि १२ रोजी महा अधिवेशन व नूतन अध्यक्षांची घोषणा व त्यांचा शपथविधी होणार आहे. यासाठी मा.ना. श्रीपाद नाईक, केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री,भारत सरकार मा.ना. आशिष जायसवाल, राज्य मंत्री (महाराष्ट्र राज्य) खासदार डॉ. संजय जायसवाल, (पश्चिम चंपारण – बिहार) खासदार मनीष जायसवाल, (हजारीबाग लोकसभा) ना.डॉ. दिलीप कुमार जायसवाल, प्रदेश अध्यक्ष, भाजपा बिहार तथा सह राजस्व व भूमि सुधार मंत्री, बिहार, ना.श्री. रविन्द्र जायसवाल, राज्यमंत्री, स्वतंत्र प्रभार (उ.प्र) , माजी मंत्री श्रीमती अनुपमा जायसवाल (उ.प्र), आ. पवन जायसवाल, ढाका बिहार तथा माजी राष्ट्रीय अध्यक्ष अ. भा. युवा जायसवाल महासभा, आमदार प्रदीप जायसवाल, संभाजीनगर (महाराष्ट्र राज्य) आमदार रमेश जायसवाल (मुगलसराय, चंदोला),आ. नविन जायसवाल, हटीया (झारखंड) मा.आ विजय शिवहरे, (विधान परिषद सदस्य ,आगरा- फिरोजाबाद) यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
दहाव्या दोन दिवसीय अधिवेशनाचा प्रारंभ शनिवार दि ११ रोजी दुपारी तीन वाजता राष्ट्रीय कार्यसमितीच्या विशेष सर्वसाधारण बैठकीने होईल. अखिल भारतीय जायसवाल महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक जायसवाल यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न होऊन यामध्ये देशभरातील महासभेचे पदाधिकारी आपले विचार मांडतील. त्यानंतर संध्याकाळी सात वाजता अखिल भारतीय जायसवाल महिला महासभेची बैठक राष्ट्रीय महिला अध्यक्षा श्रीमती अनुपमा जायसवाल यांच्या अध्यक्षतेखाली तर रात्री आठ वाजता युवा अध्यक्ष राजा चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली युवा महासभेची बैठक संपन्न होईल.
दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवार दि १२ रोजी सकाळी दहा वाजता मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण होऊन भगवान सहस्त्रार्जुन यांच्या प्रतिमेचे पूजन तथा दीपप्रज्वलन झाल्यानंतर प्रथमतः भव्य रक्तदान शिबीर या सामाजिक उपक्रमाने या महाधिवेशनाची सुरुवात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होईल. यावेळी देशभरात उल्लेखनीय समाजकार्य करणाऱ्या विविध मान्यवरांना समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. यानंतर जायसवाल महासभेचे मावळते राष्ट्रीय अध्यक्ष अशोक जायसवाल हे आगामी २०२५-२०२८ या काळासाठी अखिल भारतीय जायसवाल महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून राजकिशोर मोदी यांच्या नावाची सर्वानुमते घोषणा करतील. त्यानंतर लगेचच नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष राजकिशोर मोदी त्याचबरोबर महासभेचेच्या अन्य पदाधिकाऱ्यांचा मुख्य अतिथी द्वारे शपथविधी संपन्न होईल. नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष राजकिशोर मोदी हे कुठलेही हार,तुरे व सत्कार न घेता समाजातील होतकरू शालेय विद्यार्थ्यांसाठी वह्या, पुस्तके, व इतर शैक्षणिक साहित्य देण्याचे आवाहन करणार आहेत. जेणेकरून त्या विद्यार्थ्यांला आपले शिक्षण पूर्ण करून तो समाजमनात ताठ मानेने उभा राहील असेही राजकिशोर मोदी यांनी याप्रसंगी नमूद केले.
शपथविधी समारोहानंतर नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष हे आपले मनोगत व त्यांच्या आगामी योजना व आपल्या कार्याची रूपरेषा जाहीर करतील. मुख्य अतिथींच्या समाजप्रबोधनानंतर राजकिशोर मोदी हे महासभेच्या दहाव्या महाधिवेशनास उपस्थित राहिलेल्या सर्वांचे आभार व्यक्त करून महाधिवेशन संपन्न झाल्याची घोषणा करतील. भोजन अवकाशानंतर दुपारी दोन ते सहा या दरम्यान समाजाच्या युवक व युवतींचे परिचय संमेलन होऊन या कार्यक्रमाची सांगता होईल. या संपूर्ण महाधिवेशनाची जय्यत अशी तयारी मोदी लर्निंग सेंटरच्या निसर्गरम्य वातावरणात संयोजक राजकिशोर मोदी तथा त्यांच्या संपूर्ण सहकार्यांच्या वतीने अतिशय काटेकोर व नियोजन बद्धतेने केल्या जात आहे. हे महा अधिवेशन व्यवस्थित संपन्न होण्यासाठी विविध समित्या गठीत केल्या असून या समित्या देखील आपापली जबाबदारी अतिशय चोखपणे पार पाडत आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र प्रदेश जायसवाल संघटना, मराठवाडा जायसवाल समाज संघटना व अंबाजोगाई जायसवाल समाज संघटना हे महाअधिवेशन सुरळीतपणे संपन्न होण्यासाठी मेहनत घेत आहेत.