*वाल्मीक कराडवर ‘मकोका’ लावण्याच्या मागणीसाठी धनंजय देशमुख यांच्यासह गावकरी पाण्याच्या टाकीवर* *मनोज जरांगे यांच्या विनंतीनंतर आंदोलन मागे*
केज प्रतिनिधी: – सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाशी निगडीत खंडणी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या वाल्मीक कराडवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यासाठी मस्साजोगचे ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झालेत. मयत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी ग्रामस्थांसह गावातील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू करत स्वतःला संपवून घेण्याचा इशारा दिला आहे. धनंजय देशमुख यांनी आंदोलन करताना पाण्याच्या टाकीची शिडी काढून टाकली. मस्साजोगच्या ग्रामस्थांनी आज मोबाईलच्या टॉवरवर चढून आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. पण पोलिसांनी या टॉवरच्या भोवती प्रचंड बंदोबस्त लावल्यामुळे या ग्रामस्थांनी अचानक पाण्याच्या टाकीवर आंदोलन करण्यात आले.
खंडणीमुळे माझ्या भावाचा खून झाला. त्यामुळे खंडणीमधील गुन्हेगारांवर हत्येचा गुन्हा दाखल केला जावा. पुरावे असूनही त्यांना या प्रकरणी त्यांना आरोपी केले जात नाही. पोलिसांना पुरावे सांगितलेत, कोणी कोणाला कसा फोन केला अशा बऱ्याच घटना पोलिसांना सांगितल्यात. पण त्याचा कोणताही फायदा झाला नाही. पोलिस आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. तपासात कुचराई करत आहेत. त्यांना विष्णू चाटे यांचा मोबाईल अद्याप हस्तगत करता आला नाही. ते आम्हाला तपासाची माहितीही देत नाहीत. या प्रकरणी काहीतरी लपवण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केला आहे. दरम्यान, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सकाळीच मस्साजोगकडे धाव घेतली. बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत हे देखील घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी संतप्त महिलांनी पोलिसांना बांगड्या दाखविल्या. अखेर मनोज जरांगे पाटील आणि एसपी कॉवत यांनी मोबाईलवरून वांरवार देशमुख यांच्याशी बातचीत करून त्यांचे मनपरिवर्तन केले. त्यानंतर धनंजय देशमुख आणि त्यांचे सहकारी पाण्याच्या टाकीवरून खाली उतरले. या घटनेमुळे सकाळपासून मस्साजोग मध्ये अतिशय तणावाचे वातावरण आहे.