समर्थांचे पादुकापूजन आणि भिक्षाफेरीचे अंबाजोगाई येथे आयोजन….* —- *३१ जानेवारी रोजी शहरातून निघणार भव्य शोभायात्रा*
अंबाजोगाई प्रतिनिधी -: अंबाजोगाई येथे ३१ जानेवारी ते ७ फेब्रुवारी दरम्यान
श्रीसमर्थ रामदासस्वामी सांप्रदायिक भिक्षाफेरी आणि चरणपादुकापूजन भव्य सोहळ्याचे आयोजन
राष्ट्रगुरु श्रीसमर्थ रामदासस्वामी यांच्या विचार व कार्याची महती अवघ्या महाराष्ट्राला परिचित आहे. कर्म, उपासना, ज्ञान आणि मोक्ष या चतुसूत्री वर आधारित कर्मनिष्ठ जीवन प्रणाली या श्री समर्थ विचारांचा प्रचार व प्रसार करण्याच्या मुख्य हेतूने श्रीक्षेत्र सज्जनगडावरून श्रीरामदासस्वामी संस्थान तर्फे भिक्षा दौरा आयोजित केला जातो.
समाजाच्या एकत्रिकरणसाठी उत्सव ,महोत्सव साजरे करताना समाजाच्या प्रत्येक घटकाच्या सहकार्यातून व सहभागातून ही साजरे व्हावे म्हणून श्रीसमर्थानीं भिक्षेचा दंडक घालून दिला. आज ३७७ वर्षानंतर सुद्धा ही परंपरा कायम आहे.
या सांप्रदायिक भिक्षा फेरीचे आणि चरणपादुका पूजनाच्या भव्य सोहळ्याचे आयोजन ३१ जानेवारी ते ७ फेब्रुवारी या सप्ताहात भव्य स्वरूपात साजरा करण्याचे आयोजन झाले आहे. ३१ जानेवारी रोजी श्री समर्थ रामदास स्वामी चरणपादुकांचे भव्य स्वागत अंबाजोगाई शहराच्या वतीने केले जाणार आहे. श्री समर्थांचे अकरावे वंशज,अध्यक्ष व अधिकारी स्वामी श्री रामदास स्वामी संस्थान सज्जनगड श्री भूषण स्वामी महाराज यांची प्रमुख उपस्थिती लाभत आहे.
समर्थचरणपादुकांचा मुक्काम ३१ जानेवारी ते ७ फेब्रुवारी या कालावधीत श्रीराम मंदिर,मंडी बाजार येथे राहणार आहेत. या दौऱ्या दरम्यान काकड आरती, सूर्यनमस्कार, भजन, कीर्तन ,प्रवचन सांप्रदायिक उपासना व शेजारती असे कार्यक्रम होणार आहेत .
दररोज सकाळी ८ ते १२ या वेळेत शहराच्या विविध भागातून भिक्षेचा कार्यक्रम होणार आहे. तसेच श्री समर्थ चरणपादुकांचे सामुदायिक पूजन व वैयक्तिक पादुका पूजन घरोघरी नियोजन होत आहे. तरी या सुवर्णसंधीचा सर्व धर्मप्रेमी,समर्थ भाविक भक्तांनी अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन श्रीराम मंदिराचे मठाधिपती श्री. गदाधरबुवा रामदासी , आणि संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
—-
*३१ जानेवारी रोजी निघणार भव्य शोभायात्रा*
समर्थ रामदास स्वामी यांच्या पादुकांचे आगमन अंबाजोगाई शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे ३१ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता होणार आहे. पादुकांचे स्वागत व या निमित्ताने भव्य शोभायात्रा शहरातून निघणार आहे.