*जरांगे पाटील वैद्यकीय उपचार घेण्यास तयार;आ.धस यांची मध्यस्थी..*
जालना (प्रतिनिधी):- मराठा आरक्षणासाठी अमरण उपोषणाला बसलेले आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अखेर उपचार घेण्याचं मान्य केलं आहे. जरांगे पाटील यांना सलाईन लावण्यात आलं आहे.काल रात्री उशिरा आमदार सुरेश धस यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली. त्या भेटीत त्यांनी आम्ही तुम्ही म्हणता त्या मागण्या नक्की पूर्ण करू. मी तसा सरकारकडे पाठपुरावा करतो. मात्र, तब्येत पाहता सलाईन घ्या अशी विनंती केली होती. ती विनंती मान्य करत जरांगे यांनी उपचारासाठी मान्यता दिली आहे.आरक्षणाबाबत अनेक मुद्दे आहेत ते चर्चेने सुटू शकतात. त्यामुळे जर आपण उपचार घेतते तर आपल्याला चर्चा करता येईल असंही आमदार धस म्हणालो होते. अखेर आमदार सुरेश धस यांच्या विनंतीला यश आले असून आज जरांगे यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. त्याचबरोबर उपस्थित मराठा आंदोलकांनीही जरांगे यांना उपचार घेण्यासाठी विनंती केली होती. दरम्यान, आज जरांगे काय भूमिका घेतात याकडं आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.
*धस -जरांग पाटील यांची चर्चा ?*
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषण स्थळी रात्री उशिरा भाजप आमदार सुरेश धस यांनी भेट दिली .यावेळी त्यांनी उपचार घेऊन सलाईन लावण्याचा आग्रह धरला .मनोज जरांगे पाटील यांच्या काही मागण्यांबाबत मुख्यमंत्री सकारात्मक असल्याचे धस यांनी जरांगे पाटील यांना सांगितलं. शिंदे समितीला कुणबी नोंदी शोधण्यासाठी मुदतवाढ तसंच, आंदोलकांवरील गुन्हे आणि कुणबी नोंदणीच्या शोधासाठी जिल्हा आणि तालुकास्तरावर कक्ष स्थापन करण्याबाबत मुख्यमंत्र्यांची चर्चा झाल्याचं आमदार सुरेश धस यांनी मनोज जरांगे पाटील यांना सांगितलं, दरम्यान आपण पुन्हा एकदा अंतरवाली सराटी येथे येणार असल्याचं देखील ते म्हणाले.
*संतोष देशमुख यांना न्याय मिळेपर्यंत लढणार*
संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली, यासाठी सुद्धा आपण लढायचे आहे. यातील सर्वच आरोपींना फाशीची शिक्षा करण्याची मागणी आपण या आंदोलनात केली आहे. संतोष भैयाला न्याय मिळेपर्यंत आपण लढणार आहोत. सरकारने मराठ्यांच्या मागण्यांची तातडीने अंमलबजावणी करा. मराठ्यांची मागणी मुख्यमंत्री नक्कीच पूर्ण करतील असा विश्वास आ.सुरेश धस यांनी व्यक्त केला आहे.
या ठिकाणी उपोषणकर्त्यांची तब्येत खालावली आहे. चार दिवसांत 15 उपोषणकर्त्यांची तब्येत खालावली असल्याने त्यांना अंबड जालना येथे शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल वाघमारे यांनी दिली.रात्री आ.सुरेश धस मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन उपचार घेण्याची त्यांना विनंती केली. रात्री उशिरा जरांगेंना तीन मोठ्या व तीन लहान सलाईन लावण्यात आलेल्या आहेत, असे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. वाघमारे यांनी सांगितले.