*भेळ विक्रेत्यावर हल्लाः तीन तरुणांकडून मारहाण आणि लूट*
अंबाजोगाई (प्रतिनिधी) -शहरातील योगेश्वरी कॉलेजच्या गेटजवळ भेळगाडी चालवणाऱ्या प्रकाश प्रजापत यांच्यावर तीन अनोळखी तरुणांनी हल्ला करत मारहाण केली व गाडीतून १२०० रुपये जबरदस्तीने काढून घेतल्याची घटना घडली.
प्रकाश प्रजापत हे दररोज संध्याकाळी आपल्या गाडीतून भेळ विक्री करून उपजीविका भागवत असतात. काल (२९ जानेवारी) रात्री ९ वाजताच्या सुमारास ते व त्यांचा मुलगा अजय प्रजापत हे गाडीवर असताना तिथे विष्णु रामेश्वर पतंगे (रा. गीता), अनिकेत महादेव मिसाळ (रा. नारायण पार्क, अंबाजोगाई) आणि अभय शिंदे (रा. भगवान बाबा चौक, अंबाजोगाई) हे तीन तरुण स्कुटीवर आले. त्यांनी दारू पिण्यासाठी जबरदस्तीने त्यांच्याकडे पैसे मागितले. पैसे न दिल्यामुळे त्यांनी प्रजापत यांना शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच, भेळगाडीच्या काचा फोडून नुकसान केले आणि गल्ल्यातील 1200 रुपये जबरदस्तीने काढून घेतले.ही घटना पाहून शेजारील आईस्क्रिम गाडी चालक राजुलाल जाट आणि त्यांचे सहकारी नारायणलाल रावत मदतीला आले. मात्र, त्यांनाही मारहाण करत आईस्क्रिम गाडीचे नुकसान करण्यात आले. हल्लेखोरांनी प्रजापत यांना जीवे मारण्याची धमकीही दिली.
घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी चौकशी केली असता, आरोपींची नावे असल्याचे समजले. या प्रकरणी प्रकाश प्रजापत यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून त्यावरून तिन्ही तरुणांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलं. पुढील तपास सुरू आहे.