अंबाजोगाई

*शून्यातून विश्व निर्माण करणारे युनूस खान पठाण..*

अंबाजोगाई प्रतिनिधी:-

अंबाजोगाई पासून दहा किलोमीटरवर असणारे पूस गाव. युनूस नावाचा एक छोटा मुलगा आपल्या वडिलांच्या बरोबर रस्त्याचे काम करायचा. त्याचे वडील गॅंगमॅन होते. गावातील जिल्हापरिषद शाळेत तो जात होता. काळाबरोबर युनूसचे वय वाढत होते तसे घरातील रोजीरोटीला मदत करण्यासाठी तो ब्रेड विकण्याचे काम करत होता. यासर्वात त्याने शाळा सोडली नाही हे विशेष.

दोन भाऊ आणि एक बहीण व आई वडील असे त्यांचे कुटुंब. एकुणात लहानपणा पासूनचे कष्ट करण्याचे युनूसच्या पाचवीला पुजले होते. दहावी झाली आणि युनुस कामाला लागला. तो ऊसाच्या ट्रकवर ड्रायव्हरला सहाय्यक म्हणून काम करू लागला. आता ट्रकचे वेगवेगळे काम पण तो करू लागला. टायर पंम्चर झाल्यावर ते काढणे हे अवघड काम होते. १७ वर्षाच्या त्या तरुण पोराच्या मध्ये अफाट शक्ती होती. तो लीलया ते मोठे चाक बाजूला काढून दुसरे बदलू लागला. कष्ट करणाऱ्या युनूसकडे त्याच्या मामाचे लक्ष होते. मामा शेख मैनुद्दीन यांची स्वतःची ट्रक होती. त्या ट्रक वर काही वर्षे सहाय्यक आणि नंतर ड्रायव्हर म्हणून काम करायला युनूस यांनी सुरुवात केली. ते मन लावून काम करत होते.

कामातील चुणूक पाहून मामाला वाटले पोरगा नशीब काढणार. त्यांनी आपली मुलगी जुलेखाचा युनूसशी निकाह लावायचा प्रस्ताव युनूसच्या वडिलांच्या समोर ठेवला. प्रस्ताव मान्य झाला आणि युनूस मामाचा जावाई झाला. टायरचे काम येत असल्याने मामांनी युनूसला टायरचे काम करण्याचा सल्ला दिला. बोधिघाट येथे एका छोट्याश्या जागेत दुकान थाटले. तो भाग तसा अवघड. अनेक लोक संध्याकाळी दारू पिऊन त्रास द्यायचे. गोडी गुलाबीने बोलून परिस्थितीला ते तोंड देत होते. अशातच एक दिवस दुकानाला आग लागली की लावली कळले नाही. दुकान म्हणजे लाकडी फळ्यांचे होते त्यामुळे जळून खाक व्हायला वेळ लागला नाही.

अनुभवातून शिकून आता दुकान बांधून घ्यायचे निश्चित केले. परत नव्यांने कामाला सुरुवात केली. याच काळात कुटुंबाच्या आघाडीवर पण युनूस यांना लढावे लागत होते. बायकोचा लाडका भाऊ वसीमचे नाव त्यांनी दुकानाला ठेवले होते. वसिम टायर वर्क्स. इकडे कुटुंब विस्तारत होते. युनूस आता वडील झाले होते. पण हा आनंद त्यांना फारसा घेता नाही आला.

जुलेखाला आजाराने विळखा घातला.लातूरला डायलिसिससाठी जावे लागायला. खर्च तर वाढत होता आणि कष्ट पण तुफान करावे लागत होते. यातच दुकानाच्या भिंती फाकायला लागल्या. दुकान कधी कोसळेल याचा नेम नव्हता. शेवटी ती जागा विकत घेऊन चांगले बांधकाम करायचे ठरवले.

आपले दुकान आधुनिक असावं. सर्व प्रकारच्या सोयी त्यात असाव्यात. एकदा जोडलेले गिराईक कधीच दुसरीकडे जाऊ नये. टापटीप कपडे घालून फक्त गल्ल्यावर बसण्यापेक्षा वर्कशॉप ड्रेस घालून फिल्डलेव्हलचे काम करावे. ह्या काही तत्वांना युनूस खान पठाण कटिबद्ध होते. शून्यातून निर्माण केलेलं काम त्यांना खूप वाढवायचे होते.

डॉ. भाऊसाहेब देशपांडे आपल्या गाडीत नायट्रोजन हवा भरायचे ते सहज युनूस यांना म्हणाले आता नायट्रोजन हवा भरायची मशीन घेऊन टाका. फारसा वेळ न लावता नायट्रोजन हवेची मशीन घेतली. आजच्या घडीला अंबाजोगाईत एकमेव नायट्रोजन हवेची मशीन युनूस यांच्याकडे आहे. आता दुकानात सगळ्या सोयी उपलब्ध आहेत. चांगले दोन मजली दुकान बांधले आहे. या प्रवासात मात्र जुलेखा यांचा अघटित मृत्यू झाला. युनूस यांनी त्यांच्यासाठी खूप प्रयत्न केले. पण यश नाही मिळाले.

उत्तमता,आधुनिकता, सचोटी आणि प्रेमळ वागणूक यामुळे वसिम टायर वर्क्स आज अंबाजोगाईचा ब्रॅण्ड बनला आहे. चक्क यानावाने इतर चार दुकाने सुरू झाले आहेत. शून्यातून विश्व निर्माण करणारे युनूस खान पठाण एक आगळंवेगळं व्यक्तीमत्व !!! आता त्यांच्या बरोबर त्यांनी निर्माण केलेल्या वाटेवर त्यांची दोन मुलं काम करतात अगदीच त्यांच्यासारखी !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!