* चोरीचे प्रकरण खुप वाढलेले असताना केज व धारूर बसस्थानकावर होणारी गंठणचोरी टळली* *पोलीस कर्मचारी तेजेश वाहूळे यांनी पुन्हा एकदा दाखवली सतर्कता*
केज प्रतिनिधी : बीडहून बसमध्ये अंबाजोगाईकडे निघालेले पोलीस कर्मचारी तेजेस वाहूळे यांच्या सतर्कतेमुळे केज व धारूर बसस्थानकावर होणारी संभाव्य मोठी चोरी टळली आहे.
तेजेश वाहुळे हे अंबाजोगाईला जात असताना केज बसस्थानकात दोन संशयास्पद महिला गर्दीत फिरताना दिसल्या. त्यांनी महिलांवर बारकाईने लक्ष ठेवले, मात्र त्यांना संशय आल्याने दोघींनी तोंड झाकून बसस्थानक सोडले. महिला पकडण्यास मर्यादा असल्याने वाहुळे यांनी त्वरित केज पोलिसांना माहिती दिली. मात्र, पोलीस वेळेत पोहोचू शकले नाहीत, त्यामुळे दोन्ही महिला निघून गेल्या. तत्पूर्वी, वाहुळे यांनी महिलांचा व्हिडिओ शूट केला आणि हा व्हिडिओ धारूर पोलिसांना सतर्कतेसाठी पाठवला. अपेक्षेप्रमाणे दोन्ही महिला धारूर बसस्थानकात आल्या आणि सतर्क असलेल्या धारूर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून होणाऱ्या चोरीला प्रतिबंध करण्यात आला.
*चोरीच्या संभाव्य घटना रोखण्यात यश*
सदर महिला अट्टल चोर असल्याची माहिती समोर येत आहे. त्या जिल्हाभर फिरून दागिने चोरी करतात, असे प्राथमिक तपासात समोर आले आहे. वाहुळे यांच्या सतर्कतेमुळे व धारूर पोलिसांच्या तात्काळ कारवाईमुळे मोठी चोरी टळली. पोलिसांनी महिलांची चौकशी सुरू केली असून, त्यांच्या पूर्वीच्या गुन्ह्यांची माहिती घेतली जात आहे. जिल्ह्यात अशा घटना रोखण्यासाठी नागरिकांनीही सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
*महिनाभरात वाहूळे यांची दुसरी कौतुकास्पद कामगिरी*
यापूर्वी देखील सुटीवर असताना देखील वाहूळे यांनी सतर्कता दाखवल्यामुळे आंतरराज्यीय मोबाईल चोरांच्या टोळीचा छडा लागून त्यांच्याकडून ६३ मोबाईल जप्त करण्यात आले होते. या कामगिरीबद्दल बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी वाहूळे यांचा सत्कार केला होता.