परळी

परळी वीज निर्मिती केंद्रातील राखेच्या बंधाऱ्यातील 100 टक्के कोटा प्रदूषण बाधित दाऊतपूरला द्यावा या मागणीसाठी गावकऱ्यांचे आमरण उपोषण सुरू 

 उपोषणाचा आज तिसरा दिवस, तिघांची प्रकृती खालावली

परळी प्रतिनिधी:–परळी औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील राखेच्या बंधाऱ्यात जमा होणाऱ्या राखेतील 100 टक्के राख उचलण्याचा कोटा सर्वाधिक प्रदूषित बाधित दाऊदपूरला द्यावा तसेच वीज निर्मिती केंद्राने काढलेले पॉन्ड एश टेंडर प्रक्रिया तात्काळ रद्द करावी आदी मागण्यासाठी दाऊतपुर येथील नागरिकांनी वीज निर्मिती केंद्राच्या नवीन संच क्रमांक 6 व 7 च्या गेट समोर आमरण उपोषणास 4 फेब्रुवारी पासून सुरुवात केली आहे. उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. दरम्यान उपोषणास बसलेल्या दोघांची प्रकृती खालावली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मौजे दाऊतपुर राख नियंत्रण कृती समितीच्या वतीने संचालक ( खनिकर्म) ,महानिर्मिती प्रकाश गड मुंबई तसेच मुख्य अभियंता औष्णिक वीजनिर्मिती केंद्र परळी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रदूषण बाधित दाऊतपुर येथील पॉन्ड एश टेंडर प्रक्रिया तात्काळ रद्द करावी व प्रदूषण बाधित स्थानिक नागरिकांना 100 टक्के कोटा आपण ठरवून दिलेल्या बेसिक दर 75 रुपये प्रति टन दराप्रमाणे उचलण्याची परवानगी द्यावी. प्रदूषण बाधित बेरोजगार युवकांना 16 हजार रुपये प्रशिक्षण व मानधन द्यावे, तसेच केंद्र सरकारच्या नियमानुसार मौजे दाऊतपूरला सीएसआर निधी उपलब्ध करून द्यावा.

दाऊतपुर गावालगत वीज निर्मिती केंद्राचे राखेचे तळे आहे. या राखेच्या तळ्यामध्ये साठवलेल्या राखेमुळे गावातील नागरिकांना श्वसनाचे त्रास, त्वचाचे त्रास, डोळ्याचे त्रास, तसेच हृदयविकाराचे आजार जडत असल्याने अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तसेच राखेमुळे गावकऱ्यांच्या शेतातील शेती उत्पन्नावरही मोठा परिणाम झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे.

वीज निर्मिती केंद्राच्या धोरणाप्रमाणेच 1996 पासून राखीच्या तळ्यातील राख मोफत घेऊन जाण्याचे धोरण निर्मिती केंद्राने अवलंबलेले आहे. तसेच याबाबत 2021 मध्ये सुद्धा निर्मिती केंद्राने दाऊतपुर ग्रामपंचायतला अशा प्रकारचे पत्र दिलेले आहे. तर जे टेंडर प्रक्रिया काढली होती त्याची मुदत 2024 मध्ये संपली होती. दरम्यान त्यानंतर केंद्राने टेंडर काढले त्यामध्ये सर्वाधिक राखेचा फटका दाऊतपूर गावाला बसत असल्याने व गावकऱ्यांची प्रचंड आरोग्याच्या दृष्टीने, शेतीच्या दृष्टीने व आर्थिक हानी होत आहे. त्यामुळेच सर्वाधिक प्रदुषण बाधित दाऊतपूरला कोटा देण्याची मागणी गावकरी उपोषणाद्वारे करीत आहेत.

परंतु वीज निर्मिती केंद्राच्या वतीने गावकऱ्यांना दिलेल्या पत्रात संपूर्ण 100 टक्के कोटा दाऊतपूर येथील स्थानिक नागरिकांना देणे शक्य नाही असे म्हटले आहे. हा संपूर्ण गावकऱ्यावर अन्याय असल्याची भावना उपोषणकर्त्यामध्ये आहे. तसेच वीज निर्मिती केंद्रातील राख उपयोगीता विभागाचे अधिकारी काही लोकांना हाताशी धरून मुठभर लोकांचा फायदा करण्यासाठी हजारोंच्या पोटावर मारत असल्याचा तीव्र भावना गावकऱ्यांमध्ये आहे. जोपर्यंत पॉन्ड एश टेंडर प्रक्रिया रद्द होत नाही. आणि प्रदूषण बाधित दाउतपूर गावासाठी 100% राखी कोटा दिला जाणार नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण गावकऱ्यांच्या वतीने चालूच राहील असे हे उपोषणकर्त्यांनी म्हटले आहे.

या उपोषणास दावतपूर राख नियंत्रण कृती समितीचे अध्यक्ष सुग्रीव शंकर बिडगर, अंगद बिडगर, गौतम भंडारे, राहुल भालेराव, प्रशांत बिडगर, महेश बिडगर, रमेश गायकवाड, महेश बिडगर, सुभाष फड, गणेश मुंडे, केदार मुंडे, व्यंकट फड, सुभाष बिडगर, हनुमंत बिडगर, मारुती सोडगीर, जेजेराम काचगुंडे, संगीत बिडगर, सुरज बिडगर, इंदुबाई फड, अनिता गायकवाड, अनुसया भालेराव, संगीताबाई हरभरे, सिमींताबाई फड, छायाबाई फड, कुसूमबाई सोडगीर, यांच्यासह शेकडो महिला, पुरुष मोठ्या संख्येने उपोषणास बसले आहेत.

दरम्यान उपोषणास बसलेल्या पैकी दोघांची प्रकृती खालावली आहे तरीही अद्याप वीज निर्मिती केंद्रांने गावकऱ्यांच्या आमरण उपोषणावर तोडगा काढलेला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!