*स्वाराती रुग्णालयात 8 कोटींची ॲन्जोग्राफी मशीन धूळखात, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष*
अंबाजोगाई प्रतिनिधी: – गोरगरीब रुग्णांसाठी ‘स्वाराती’ रुग्णालयात 8 कोटी रुपये खर्चून आणलेली ॲन्जोग्राफी आणि ॲन्जोप्लास्टी मशीन वर्षभरापासून धूळखात पडून आहे. प्रशासनाची उदासीनता आणि लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष यामुळे रुग्णांना उपचारापासून वंचित रहावे लागत आहे.
स्वाराती रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात ग्रामीण भागातून मोठया प्रमाणात रुग्ण उपचार घेण्यासाठी येतात. राज्य सरकारकडून रुग्णालयाला करोडो रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. गेल्या वर्षी वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागानं 8 कोटींची ॲन्जोग्राफी व ॲन्जोप्लास्टीची मशीन रुग्णालयाला उपलब्ध करुन दिली. या मशीनचे इन्स्टॉलेशन प्रकिया देखील पूर्ण झाली असून केवळ डॉक्टर्स् आणि टेक्निशियन अभावी ही मशीन रुग्णालयात धूळखात पडून आहे. रुग्णालयात ही मशीन कार्यान्वित झाल्यास हृदयरोगाचे निदान व उपचार करण्यास मदत होणार आहे. हृदयरोगाच्या उपचारासाठी खाजगी रुग्णालयात जावे लागते, ज्यामुळे आर्थिक भुर्दंड बसतो.यामुळे मशीन तात्काळ सुरू करावी अशी मागणी करण्यात येत आहे.
ॲन्जोग्राफी म्हणजे काय?
ॲन्जोग्राफी ही एक वैद्यकीय चाचणी आहे, ज्याद्वारे रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस आहेत का, हे तपासले जाते. हृदयविकार होण्याची शक्यता वाटल्यास डॉक्टर ॲन्जोग्राफी करण्याचा सल्ला देतात.
स्वाराती रुग्णालयात 8 कोटी रुपये खर्चून आणलेली ॲन्जोग्राफी मशीन धूळखात पडल्याने गोरगरीब रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी यावर तातडीने लक्ष देऊन मशीन सुरू करण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी जनतेतून जोर धरत आहे.