संतोष देशमुख हत्या प्रकरण:मनीषा बिडवेचा मोबाईल पोलिसांकडून हस्तगत, तपासाला नवे वळण मिळण्याची शक्यता..
बीड प्रतिनीधी: –
मनीषा बिडवे यांच्या हत्याप्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. पोलिसांनी मनिषा बिडवे यांचा मोबाईल हस्तगत केला असून हा मोठा पुरावा मानला जात आहे. यामुळे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे. कारण संतोष देशमुख यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी मनीषा बिडवेचा वापर केला जाणार होता, त्यामुळेच तिची हत्या केली, असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला होता.
मनिषा बिडवे हिचा काही दिवसांपूर्वी कळंब येथे तिच्या राहत्या घरी खून करण्यात आला होता. तिचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला होता. याप्रकरणी पोलिसांनी तिचा ड्रायव्हर रामेश्वर भोसले याच्यासह दोन आरोपींना अटक केली होती. मनीषाच्या छळाला आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून तिची हत्या केल्याची कबुली रामेश्वरने दिल्याचे वृत्त होते.
मोबाईलमुळे देशमुख हत्या प्रकरणाचे धागेदोरे मिळणार?
आता पोलिसांना मनिषा बिडवे या महिलेचा मोबाईल सापडला असून तो हस्तगत केला आहे. हा मोबाईल आरोपी रामेश्वर भोसले याच्याच घरात पोलिसांना सापडला. रामेश्वरने मनिषाची हत्या केल्यानंतर तिचा मोबाईल पळवला होता आणि नंतर पैशांसाठी विकल्याचे त्याने यापूर्वी सांगितले होते, मात्र आता तो त्याच्याच घरात सापडला. सापडलेला मोबाईल डिस्चार्ज असून, या मोबाईलच्या माध्यमातून पुढील धागेदोरे पोलिसांच्या हाती येण्याची शक्यता आहे. मनिषा नेमकी कोणाकोणाच्या संपर्कात होती?, तिचे आर्थिक व्यवहार काय होते? तिचा संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी काही संबंध होता का? याचाही शोध पोलिस घेणार आहे.
आरोपी रामेश्वर भोसले सुदर्शन घुलेच्या गावचा रहिवासी
दरम्यान, मनिषा बिडवे हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी रामेश्वर भोसले हा केज येथील रहिवासी आहे. तो संतोष देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले याच्या गावात उसतोडणीच्या कामाला होता, अशी माहिती समोर येत आहे. बिडवे यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य साक्षीदार महादेव घुले हा देखील सुदर्शन घुलेच्या गावचा रहिवासी आहे. या हत्या प्रकरणातील दोन्ही आरोपी आपल्याकडे ऊस तोडणीच्या कामाला होते, अशी माहिती महादेव घुले यांनी दिली आहे.
दरम्यान, काही जणांनी मनीषा बिडवे ही संतोष देशमुखांना अडकवण्याच्या कटातील महिला नसल्याचे म्हटले असले, तरी अंजली दमानिया यांच्या आरोपामुळे आणि आता मोबाईल सापडल्याने या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहिले जात आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अधिक चौकशीसाठी बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील उमरा गावात नेले असून, गावच्या परिसरात आरोपी आणि मनीषा बिडवे यांच्या संबंधांबद्दल अधिक तपास सुरू आहे. या मोबाईलमुळे दोन्ही हत्या प्रकरणांतील गूढ उकलण्यास मदत होईल, असा पोलिसांना विश्वास आहे.