पेट्रोल पंप चालकांकडून शासन नियमांची पायमल्ली पंपावरील हवा, पाणी, शौचालये झाली गायब; ग्राहकांना मनस्ताप; २४ तास सेवा फक्त नावावरच
अंबाजोगाई प्रतिनिधी:– तालुक्यातील पेट्रोल पंपावर ग्राहकांसाठी कुठल्याही प्रकारच्या सुविधा उपलब्ध नसून, पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या ग्राहकांची गैरसोय होत आहे. केवळ शासनाच्या विविध निकषांची कागदोपत्रीच पूर्तता होत आहे. मात्र, प्रत्यक्षात नियमांची ऐशीतैशी पेट्रोल पंप चालकांकडून होत आहे.
अंबाजोगाई तालुक्यात २० ते २५ पेट्रोल पंप आहेत. मात्र, एक-दोन पेट्रोल पंप वगळता कुठल्याही पेट्रोल पंपावर हवा, पाणी, शौचालय या सुविधा उपलब्ध नसल्याने ग्राहकांची मोठी पंचाईत होत आहे. अपवाद वगळता संपूर्ण तालुक्यातील सगळ्याच पेट्रोल पंपावर सुविधा व गुणवत्तेचे निकष पाळले जात नाहीत, हे खुप मोठी शोकांतिका असल्याचे ग्राहक सांगतात. शासनाच्या विविध निकषांची कागदोपत्री पूर्तता करून तालुक्यात पेट्रोल पंप सुरू आहेत. राष्ट्रीय महामार्ग, राज्यमार्ग, जिल्हा मार्ग तालुक्यातून जातात. राष्ट्रीय महामार्गावर दोन ते तीन
किलोमीटर अंतरावर पेट्रोल पंप आहेत. मात्र, ठराविक पेट्रोल पंप वगळता कुठेच ग्राहकांसाठी सुविधा उपलब्ध नाहीत. पंपावर येणाऱ्या ग्राहकांसाठी पंप चालकाने मोफत सुविधा पुरविण्याची तरतूद असताना नियमांची पायमल्ली होतांना दिसत आहे.
पेट्रोल पंपावरील शासनाचे निकष
पेट्रोल पंपावर येणाऱ्या ग्राहकांसाठी पिण्याचे पाणी, शौचालय, वाहनामध्ये हवा भरण्याची व्यवस्था आदी सुविधा उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. इंधनाची शुद्धता तसेच गुणवत्ता यांचे निकष करणे हे पेट्रोल पंप चालकांसाठी आवश्यक केले आहे. इंधनाचे प्रत्येक दिवसाचे दर, एकूण साठा, इंधनाची शुद्धता दर्शविणारे पत्रक आदी माहितीच्या अद्यावत नोंदी पंपाच्या दर्शनी भागावर लावणे नियमाने बंधनकारक आहे. एवढे नियम व निकष झुगारून तालुक्यातील काही पेट्रोल पंप चालकांनी मनमानी सुरू केली असल्याची ओरड सुरू आहे.
सुविधांचे वाजले तीन-तेरा
तुटलेले पाण्याचे नळ, पडक्या स्थितीत असलेले शौचालये, अस्ताव्यस्त झालेले हवेचे पाईप इत्यादी समस्यांनी पेट्रोल पंपावरील सुविधांचे तीन-तेरा वाजले आहेत. त्यामुळे पंपावरील व्यवस्था नावापुरती उरली आहे. शासनाने घालून दिलेल्या निकषांची पूर्तता पंप चलकांकडून होत नसल्याने कारवाईची मागणी ग्राहक करीत आहेत
कर्मचाऱ्यांची वाढली अरेरावी
प्रत्येक पेट्रोल पंप चालकांकडून ग्राहकांना २४ तास सुविधा देणे बंधनकारक आहे. तसे फलकही त्यांच्याकडून दर्शनी भागात लावले जातात. परंतु, रात्रीचे दहा-अकरा वाजले की, पेट्रोल पंपावर काम करणारे कर्मचारी बिनधास्त झोपतात. आपातकालीन परिस्थितीत एखादे वाहन पेट्रोल, डिझेल भरण्यासाठी पंपावर आले असता, कर्मचाऱ्यांकडून त्यांना पेट्रोल, डिझेल देण्यास टाळाटाळ केली जाते. एवढेच नाही, तर सकाळी सहा-सात वाजताही पेट्रोल पंपावर गेले असता, कर्मचाऱ्यांना कितीही आवाज देऊन झोपेतून उठवण्याचा प्रयत्न केला असता ते उठत नाहीत. उलट ग्राहकासोबत हुज्जतबाजी करत असल्याचे अनेक प्रकार उजेडात येतात.
तहसीलदारांचे दुर्लक्ष
तालुक्यातील पेट्रोल पंपावर अनेक सुविधा नाहीत. याबाबत वारंवार नागरिकांनी सांगूनही यामध्ये सुधारणा झाल्या नाहीत. या पंपावर देखरेख करण्याचे काम महसूल प्रशासनाचे आहे. असे असताना तहसीलदार विलास तरंगे यांचे याकडे साफ दुर्लक्ष होत आहे. याबाबत माहिती घेण्यासाठी तहसीलदार विलास तरंगे यांना संपर्क केला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही