*TV9 च्या लोकप्रिय वृत्तनिवेदीका निखिला म्हात्रे व बुलढाणा अर्बन बँकेचे संस्थापक राधेश्यामजी चांडक यांची अंबाजोगाई पिपल्स को ऑप बँकेस सदिच्छा भेट*
अंबाजोगाई (प्रतिनिधी):- महाराष्ट्र राज्यात नावाजलेल्या TV9 या मराठी वृत्तवाहिनीच्या लोकप्रिय वृत्तनिवेदीका निखिला म्हात्रे तसेच बुलढाणा अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटीचे संस्थापक राधेश्यामजी चांडक (भाईजी) हे अंबाजोगाई शहरात काही कामानिमित्त आले असतांना त्यांनी अंबाजोगाई पिपल्स को ऑप बँकेचे मुख्यालय सहकार भवन येथे बँकेचे संस्थापक राजकिशोर मोदी यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी अंबाजोगाई पिपल्स बँकेचे उपाध्यक्ष प्रकाश सोळंकी, संचालक प्रा वसंत चव्हाण, ऍड विष्णुपंत सोळंके, बाबू पटेल TV9 चे प्रतिनिधी संभाजी मुंडे हे उपस्थित होते.
प्रथमतः या दोन्ही पाहुण्यांचा फेटा बांधून तसेच शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. उभयतांच्या या भेटीमध्ये राजकीय, आर्थिक तसेच पत्रकारिता क्षेत्रातील विविध विषयांवर चर्चा झाली. हल्लीच्या काळात वृत्तवाहिन्या या आपला टीआरपी वाढविण्यासाठी एकमेकांत जीवघेणी स्पर्धा करत आहेत. या स्पर्धेमध्ये उतरण्यासाठी व टिकण्यासाठी वृत्त वाहिन्या देखील आपल्या पत्रकारांना घडणाऱ्या किंवा घडत असलेल्या घटनांचे वार्तांकन करण्यासाठी त्यांना पळवत आहेत. हे करताना अनेकदा ग्लॅमरच्या पाठीमागे वाहिन्या जास्तवेळ पळताना आढळून येतात. यामुळे एखाद्या सामान्य माणसाच्या घटनेची किंवा सामान्य शेतकऱ्यांची बातमी कधी कधी तशीच मागे राहून जाते अशी स्पष्ट भावना सुप्रसिद्ध वृत्तनिवेदीका निखिला म्हात्रे यांनी या भेटीदरम्यान बोलून दाखविली. अंबाजोगाई सारख्या छोट्याशा शहरातील राजकीय , सांस्कृतिक व शैक्षणिक सुधारणा पाहून आनंद व्यक्त केला. राजकिशोर मोदी यांनी सुरू केलेल्या अंबाजोगाई पिपल्स बँकेची आर्थिक वाटचाल व येथील आर्थिक भरभराट पाहून निखिला म्हात्रे यांनी मोदी यांचे अभिनंदन देखील केले.
बुलढाणा अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटीचे संस्थापक राधेश्यामजी चांडक यांनी देखील अंबाजोगाई पिपल्स को ऑप बँकेची मार्च २०२५ अखेरची आर्थिक परिस्थिती पाहून आनंदच व्यक्त केला. मार्च २०२५अखेर अंबाजोगाई पिपल्स बँकेने ५७३ कोटींचा व्यवसाय करत ६ कोटी ६३ लाखांचा नफा मिळवल्याबद्दल बँकेचे संस्थापक राजकिशोर मोदी व त्यांचे सर्व संचालक सहकारी तसेच बँकेचे सर्व कर्मचारी, ग्राहक व ठेवीदार यांचे अभिनंदन केले. अंबाजोगाई पिपल्स बँकेचा आदर्श यापुढे आपणही घेऊ असा आशावाद राधेश्यामजी चांडक यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.