*राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला परळीत मिळणार नवी कार्यकारिणी!*
पक्षाचे नेते राजेभाऊ फड यांनी घेतली खा.बजरंग बप्पा सोनवणे व राजेंद्र मस्के यांची भेट
परळी वैजनाथ (प्रतिनिधी)
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या परळी विधानसभा मतदार संघातील कार्यकारिणीला नवे शिलेदार मिळण्याचे संकेत आहेत. नवी कार्यकारिणी स्थापन करण्याच्या अनुषंगाने पक्षाच्या वरीष्ठ नेत्यांची सोमवारी चर्चा झाली. पक्षाचे नेते राजेभाऊ फड यांनी जिल्ह्याचे खासदार बजरंग बप्पा सोनवणे तसेच जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांची भेट घेऊन पक्षाच्या संघटन बांधणीबद्दल सखोल चर्चा केली. त्यामुळे आता पक्षाच्या रिक्त असलेल्या पदांवर नव्या नियुक्त्या केल्या जाणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. आगामी काळात रचनात्मक बांधणी आणि धोरणात्मक काम करण्यासंदर्भात यावेळी या भेटीत चर्चा झाली. याप्रसंगी पक्षाचे नेते अंकुशराव ढोबळे, बाबासाहेब शिंदे, अक्षय मुंडे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
परळी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी पक्षाचे नेते राजेभाऊ फड सक्रिय झाले आहेत. सोमवार, दिनांक 07 एप्रिल रोजी त्यांनी खा.बजरंग बप्पा सोनवणे व पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांची भेट घेऊन सखोल चर्चा केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा, देशाचे नेते शरदचंद्र पवार यांचा प्रेरक विचार घेऊन काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची मोठी फौज मतदारसंघात उभी करणार असून, पक्षाला बळकटी येईल अशा स्वरूपाचे काम करणाऱ्या आणि पक्षाशी निष्ठेने राहणाऱ्या कार्यकर्त्यांना पदाच्या माध्यमातून काम करण्याची संधी मिळणार असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले आहे. सत्तेच्या विरोधात असलो तरी पक्षाला मानणारा मोठा वर्ग या मतदारसंघात पक्षाच्या पाठीशी आहे. त्यामुळे शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर, कामगार, विद्यार्थी युवक – युवती यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आगामी काळात धोरणात्मक काम करण्यात येणार आहे. तसेच भविष्यकाळात येणाऱ्या सर्व निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी रचनात्मक बांधणी आणि धोरणात्मक काम करण्याची तयारी आम्ही ठेवली असल्याचे राजेभाऊ फड यांनी म्हटले आहे. या भेटीप्रसंगी पक्षाचे नेते अंकुश ढोबळे, जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब शिंदे, अक्षय मुंडे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.