वृद्ध दाम्पत्याच्या ९ लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला बीड-परळी-सोनपेठ एसटी प्रवासात दागिने लंपास..
परळी प्रतिनिधी :–
बीडहून परळी आणि परळीहून सोनपेठ येथे एसटीने प्रवास करणाऱ्या सोनपेठ येथील रहिवासी वयोवृद्ध जोडप्याला मोठ्या बिकट प्रसंगाला सामोरे जावे लागले. आयुष्यभर पै पै जमा करून कमविलेले सोन्याचे तब्बल ९ लाखाचे दागिने चोरीला गेल्याची घटना दि.१० एप्रिल रोजी घडली. या प्रकरणी आता परळीच्या संभाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सुत्रांकडून प्राप्त झालेल्या अधिक माहितीनुसार, फिर्यादी महिला माधुरी सुर्यकांत परळकर (वय ६० वर्षे) रा. महाजन गल्ली सोनपेठ यांनी संपूर्ण हकिकत नोंदवली आहे. त्यानुसार फिर्यादी महिला व त्यांचे पती हे छत्रपती संभाजीनगर येथे आपल्या मुलीकडे गेले होते. दि. 10/4/2025 रोजी सकाळी 11.00 वाजता संभाजीनगर येथून एस.टी. बसने बीडला आले. बीड येथून सोनपेठला जाण्यासाठी बीड-परळी बसने दुपारी 12.000 वा. बीड येथून निघून परळीला दुपारी सव्वादोन ते आडीच वाजण्याच्या सुमारास बस स्थानकात आले. सोनपेठची बस गेली होती. म्हणुन त्यांनी परळी बस स्थानकावर उसाचा रस घेतला व दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास परळी-सोनपेठ बसने सोनपेठला गेले.
घरी गेल्यावर बॅग तपासली असता बॅगमधील लाल पर्समध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने दिसले नाहीत. या पर्समध्ये 1) कि. अंदाजे 3,00,000-(रु) एक खर्बुज्या मन्याची तिन पदरी मोहन माळ, सोन्याची राहा तोळे वजनाची जुनी वापरती 2) किं. अंदाजे 3,00,000-(रु) एक सोन्याची पट्टी गंटन सहा तोळे वजनाचे जुने वापरते 3 किं. अंदाजे 2,00,000 रु.- एक नेकलेस साखळी पॅडॉलचे सोन्याचे पॅडॉलमध्ये लाल खडा असल्याले चार तोळे वजनाचे जुने वापरते 4 किं. अंदाजे 1,00,000 रु. एक सोन्याची बोरमाळ त्यात डिसको मनी असलेले दोन तोळे वजनाची जुनी वापरती असे एकुण 9,00,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीस गेल्याचे लक्षात आले.
या प्रकरणी परळीच्या संभाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध चोरीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली असुन पुढील तपास संभाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे व सहकारी करीत आहेत.