डॉ *बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त बॅडमिंटन स्पर्धेचे उदघाटन संपन्न* सशक्त, निरोगी व वैचारीक दृष्ट्या प्रगल्भ समाज निर्मिती हेच महापुरुषांचे स्वप्न होते :- उदघाटक डॉ राजेश इंगोले
प्रतिनिधी, अंबाजोगाई
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त श्री क्रीडा व सांस्कृतिक व्यायाम मंडळ अंबाजोगाई यांच्यातर्फे भव्य बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. त्याचे उदघाटन सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉ राजेश इंगोले यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी विचारमंचावर आधार माणुसकीचे कार्यवाहक ऍड संतोषजी पवार,प्रा डॉ वाघमारे, बालरोगतज्ज्ञ डॉ संदीप मोरे, चेतन मोदी, तांदळे सर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलतांना डॉ राजेश इंगोले यांनी श्री क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे बप्रवीण भैय्या देशमुख हे अंबाजोगाईतील बॅडमिंटन खेळाडूंना खूप मोठं व्यासपीठ उपलब्ध करून देत आहेत त्याबद्दल त्यांचं मनापासून कौतुक आणि आभार व्यक्त करत सांस्कृतीक, शैक्षणिक आणि क्रीडा संस्काराचे माहेरघर असलेल्या अंबानगरीत अशा दर्जेदार स्पर्धा आयोजित केल्या जाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली.
या देशातील महापुरुषांनी समाज हा वैचारीकदृष्ट्या निकोप, प्रगल्भ आणि शारीरिक दृष्ट्या निरोगी आणि सशक्त असला पाहिजे असे स्वप्न पाहिले होते. या स्वप्नपूर्तीसाठी हे क्रीडा मंडळ कार्यरत असल्याचा अभिमान असल्याचे सांगितले. खेळ हे माणसाचे आयुष्य केवळ समृद्ध बनवत नाहीत तर जीवन आनंददायी बनवतात आणि व्यक्तीला मानसिक दृष्ट्या कणखर बनवतात. कला आणि क्रीडा या दोन क्षेत्रात कुठलाच जातीभेद, धर्मभेद होत नाही तिथे फक्त कलाकार आणि खेळाडू हीच जात आणि धर्म असतो म्हणून कलाकार आणि खेळाडू हे जातीपातीच्या पलीकडे जाऊन जीवन जगतात आणि ही माणसे भारताला महासत्ता बनवतील असे प्रतिपादन डॉ राजेश इंगोले यांनी केले.
प्रा डॉ वाघमारे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त या स्पर्धांचे आयोजन ही नवसंकल्पना असल्याचे सांगत अशा स्पर्धा घेतल्याबद्दल आयोजकांचे कौतुक केले
आधार माणुसकीचे कार्यवाहक ऍड संतोष पवार यांनी खेळ हा माणसाला सशक्त निरोगी आणि आनंदी ठेवतो त्यामुळे खेळाडू सतत आनंदी समाधानी असतात असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन आणि पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
स्पर्धेच्या संयोजनासाठी श्री क्रीडा व्यायाम मंडळाच्या सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.