*एखाद्याने शिकून किती मोठं व्हावं हे संविधान निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकरांकडून शिकले पाहिजे – सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ.राजेश इंगोले*
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
सामाजिक विषमतेमुळे झालेले अन्याय सहन करून त्यापासून प्रेरणा घेवून एखाद्याने शिकून ज्ञानी व्हावं केवळ ज्ञानीच नाही तर या जगावर आपल्या बुद्धिमत्तेने राज्य करावं ,स्वतंत्र भारताची राज्यघटना लिहावी आणि परदेशी विद्यापीठांमध्ये त्यांच्या नावाचे पुतळे उभे केले जावे आणि त्या पुतळ्याखाली ‘सिम्बॉल ऑफ नॉलेज’ अर्थात ‘ज्ञानाचे प्रतीक’ असे लिहिले जावे. एवढे मोठे माणसाला होते आले पाहिजे त्याकरिता जीवनभर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श समाजातील प्रत्येक व्यक्तीने घेणे गरजेचे आहे असे मत अंबाजोगाईचे सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ तथा शिक्षण सभापती डॉ.राजेश इंगोले यांनी व्यक्त केले.
महात्मा फुले स्मारक नगर येथे प्रथमच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती मोठ्या थाटामाटात आणि जल्लोषात व वैचारिक प्रबोधन करून साजरी केली गेली त्यावेळी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. यावेळी विचारमंचावर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रा.मधुकरराव इंगोले, बी.एल.ओव्हाळ, बी.के.मसने, पीएसआय जाधव, शासकीय महाविद्यालयाच्या विभागप्रमुख प्रा.डॉ.विद्या इंगोले यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरूवात मधुकरराव इंगोले व बी.एल.ओव्हाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करून तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कऱण्यात आली. पुढे बोलताना डॉ.राजेश इंगोले यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनप्रवास उलगडून दाखवत असताना महापुरुषांचे विचार व त्या विचारांचे वारसदार यांनी समाजामध्ये कशा पद्धतीने जगले पाहिजे आणि आपल्या सोबत इतर समाजही कसा प्रगल्भ ज्ञानी आणि समृद्ध केला पाहिजे याविषयी विवेचन केले. क्रांती आणि प्रतिक्रांती या एकाच गतीने एकाच वेळी एकाच दिशेने मार्गक्रमण करत असतात त्यामुळे क्रांतीचा विचार ज्यांनी हृदयामध्ये तेवत ठेवलेला आहे त्यांनी या गोष्टीचा विचार करून समाजप्रबोधनाकडे विशेषत्वाने लक्ष दिले पाहिजे अन्यथा प्रतिक्रांती ही क्रांतीचे विचार आणि प्रगल्भता याला झाकून ठेवण्याचे काम करते असे प्रतिपादन डॉ.राजेश इंगोले यांनी केले. यावेळी बोलताना बी.एल.ओहाळ यांनी माळीनगर येथील महात्मा फुले स्मारक ही संकल्पना प्रा.मधुकरराव इंगोले यांची होती आणि त्यांनी त्यासाठी इथे स्मारकाची जागा राखून ठेवली ही आठवण सांगितले आणि हे स्मारक होण्यासाठी आता येथील नागरिकांनी प्रयत्न केले पाहिजेत अशी अपेक्षा व्यक्त केली पुरोगामी चळवळीतला कार्यकर्ता हा सदैव सजग आणि सावध असला पाहिजे कारण बदलती सामाजिक परिस्थिती अशा कार्यकर्त्यांना अधिक जबाबदारीने कार्य करण्याची संधी देते असे मत ओव्हाळ यांनी व्यक्त केले. प्रा.डॉ.विद्या इंगोले यांनी बहुजनांना गावकुसाबाहेर बसवली जात होते सामाजिक प्रवाहामध्ये येण्याची त्यांना कुठली ही संधी नव्हती क्षैक्षणिक सांस्कृतिक व सामाजिक अभिसरण प्रक्रियेत बहुजनांना कुठलीही स्थान नव्हते ते स्थान प्राप्त करून देण्याचे महान कार्य डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी बहुजनांसाठी केले हे उपकार बहुजन समाजाने विसरले नाही पाहिजे असे प्रतिपादन केले
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.अनिल नरसिंगे व सूत्रसंचालन किरण चक्रे यांनी केले. तर अध्यक्षीय समारोप रत्नदीप गोरे यांनी केला. तर उपस्थितांचे आभार ढगे सर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सुनिल नरसिंगे, संजय साळवे, विजय कचरे, आदित्य कदम यांच्यासह परिसरातील नागरिकांनी परिश्रम घेतले.