उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पुढाकारामुळे तरुणांना सीआयआयआयटीद्वारे औद्योगिक संधी –ॲड. शंकर चव्हाण
बीड प्रतिनिधी :-
बीड जिल्ह्यातील तरुणांच्या भवितव्याला दिशा देणारी, रोजगाराच्या संधी उभारणारी आणि कौशल्य विकसनाला चालना देणारी ऐतिहासिक घडामोड नुकतीच घडली आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या विशेष पुढाकाराने बीड जिल्ह्यात ‘सेंटर फॉर इन्व्हेंशन, इनोव्हेशन, इक्युबेशन अँड ट्रेनींग’ (CIIIT) उभारण्यासाठी टाटा टेक्नॉलॉजी कंपनीने १९१ कोटींची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे.
या उपक्रमामुळे दरवर्षी सुमारे ७ हजार युवकांना जागतिक दर्जाचे औद्योगिक व तांत्रिक प्रशिक्षण मिळणार असून, जिल्ह्यातील युवकांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याची आणि उद्योग क्षेत्रात नवे वळण घेण्याची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे. यामुळे रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात निर्माण होणार आहेत. हा प्रकल्प केवळ जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला चालना देणार नाही, तर तरुणांच्या भविष्यासाठी एक नवसंजीवनी ठरणार आहे असे ॲड. शंकर चव्हाण यांनी X.com (ट्विटर) वर ट्विट करत ही माहिती दिली.
अजित दादांचा विश्वास व टाटांचा सकारात्मक प्रतिसाद :
बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी सातत्याने भरीव पावले उचलली आहेत. तांत्रिक शिक्षण, औद्योगिक क्षमता व कौशल्य प्रशिक्षण या त्रिसूत्रीवर आधारित हा सीआयआयआयटी प्रकल्प म्हणजे त्यांच्या दूरदृष्टीचा उत्कृष्ट नमुना म्हणता येईल.
अजित दादांनी टाटा टेक्नॉलॉजी कंपनीला औपचारिक पत्राद्वारे सीआयआयआयटी प्रकल्पाबाबत प्रस्ताव दिला होता. या प्रस्तावाला कंपनीकडून सकारात्मक प्रतिसाद मिळताच, त्यांनी बीडसाठी १९१ कोटी रुपयांच्या निधीतून प्रकल्प राबवण्याची तयारी दर्शवली. या आशयाचे पत्र खुद्द उपमुख्यमंत्र्यांना प्राप्त झाले आहे.
रोजगाराच्या संधी, तरुणांना हक्काचं व्यासपीठ :
या सीआयआयआयटी प्रकल्पामुळे बीड जिल्ह्यातील युवकांसाठी रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या नव्या वाटा खुल्या होणार आहेत. जागतिक स्तरावर मागणी असलेल्या विविध कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाईल, जसे की ऑटोमेशन, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मेकॅनिकल डिझाईन, 3D प्रिंटिंग, इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी, आणि सस्टेनेबल मॅन्युफॅक्चरिंग. या प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेतलेले विद्यार्थी नोकरी शोधणारे न राहता, नोकरी निर्माण करणारे उद्योजक बनतील, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.
बीडच्या विकासासाठी ठोस निर्णय :
अजित पवार यांनी फेसबुक पोस्टद्वारे ही माहिती जनतेपर्यंत पोहोचवताना बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाची ग्वाही दिली आहे. “बीड जिल्ह्यात उद्योगक्षम वातावरण तयार होणे ही काळाची गरज आहे. सीआयआयआयटीसारखा प्रकल्प या दिशेने भरीव पाऊल आहे,” असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.
त्यांनी हे ही सांगितले की, “जेव्हा हे सेंटर मंजूर होऊन कार्यरत होईल, तेव्हा बीड शहरातून माझी हत्तीवरून मिरवणूक काढण्याचा संकल्प काहीजणांनी केलाय. पण मला त्या पेक्षा अधिक महत्त्वाचं वाटतं की या प्रकल्पामुळे तरुणांच्या हाताला काम मिळेल, त्यांचं आयुष्य उजळेल.”
लोकांचा विश्वास आणि उत्साह :
बीड जिल्ह्यातील नागरिक, विशेषतः युवक, अजित पवारांच्या या निर्णयामुळे अत्यंत आनंदित आहेत. अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट करून त्यांचे आभार मानले आहेत.
एक स्थानिक नागरिक म्हणतो, “दादा जेव्हा पालकमंत्री म्हणून निर्णय घेतात तेव्हा ते केवळ विकास करीत नाहीत, तर लोकांच्या मनात विश्वासही निर्माण करतात. बीडच्या तरुणांच्या हातात कौशल्यं देऊन त्यांना सक्षम करण्यासाठी घेतलेला हा पुढाकार निश्चितच अभिनंदनास्पद आहे.”
आर्थिक, सामाजिक आणि औद्योगिक प्रगतीची नवी दिशा :
सीआयआयआयटी प्रकल्प केवळ प्रशिक्षणापुरता मर्यादित नाही. यामध्ये स्टार्टअप इन्क्युबेशन, संशोधन व नवोपक्रम (Innovation) यांना देखील चालना दिली जाणार आहे. त्यामुळे बीडसारख्या जिल्ह्यातून उद्योजक तयार होतील, जे पुढे जाऊन राज्य व देशाच्या प्रगतीत हातभार लावतील.
राजकीय इच्छाशक्तीचे यशस्वी उदाहरण :
सत्तेत असलेला नेता जर विकासाला प्राधान्य देतो, तर जनतेचा कौल देखील त्यांच्या बाजूने झुकतो, हे या प्रकल्पातून स्पष्ट होते. अजित पवार यांनी केवळ घोषणा न करता त्वरित अंमलबजावणीसाठी प्रयत्न केले, आणि आज बीड जिल्ह्यातील युवकांना या भक्कम संधीची दारे उघडली आहेत.
पुढील टप्पे आणि अपेक्षित लाभ :
या प्रकल्पासाठी जागेची निवड, इमारतीचे बांधकाम, प्रशिक्षकांची निवड, अभ्यासक्रम रचना आणि विद्यार्थ्यांची निवड हे टप्पे लवकरच सुरु होणार आहेत. एकदा केंद्र कार्यरत झाल्यानंतर बीड जिल्ह्यातील तरुणांच्या बेरोजगारीची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
बीड जिल्ह्यासाठी सीआयआयआयटी प्रकल्प म्हणजे एक सुवर्णसंधी आहे. ही संधी मिळवून देणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केवळ राजकारणी नव्हे तर दूरदृष्टी असलेले नेतृत्व दाखवले आहे.
या प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी स्थानिक प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि जनतेने देखील सक्रिय सहभाग घेतल्यास बीडचा चेहरामोहरा बदलू शकतो.
“दादा, तुम्ही असेच काम करत राहा. बीडच्या तरुणांच्या भविष्यासाठी घेतलेली ही दिशा निश्चितच प्रेरणादायी आहे. – ॲड. शंकर चव्हाण