केज

शेतातल्या घरावर दरोडा, वृद्ध महिलेचे कान तोडून दागिने चोरले; माझा मुलगा मिल्ट्रीत आहे, फोन लावते म्हणताच…

बीडमधील केज तालुक्यात दरोड्याची घटना

दरोडेखोरांनी वृद्ध महिलेचे कान तोडलेे

केज /बीड प्रतिनिधी : बीड जिल्ह्यात चोरीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. केज तालुक्यातील लाडेगाव शिवारात वयोवृद्ध दांपत्याच्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये घुसून चार चोरट्यांनी धुमाकूळ घातला. 73 हजारांचा ऐवज लुटत चोरट्यांनी वयोवृद्ध महिलेचा कानही तोडला. या घटनेत वयोवृद्ध महिला गंभीर जखम झाली आहे.

चोरट्यांनी समाबाई यांच्या गळ्यातील 5 ग्रॅमचे मंगळसूत्र, 3 ग्रॅमची नथ, 4 ग्रॅमचे कानातील फुले आणि एक मोबाईल असा 73 हजारांचा ऐवज बळजबरीने लुटला. एक कानातील फूल न निघाल्याने जबरदस्ती करताना समाबाई यांचा कान फाटून गंभीर जखम झाली.

बाहेर झोपलेल्या वृद्धाला उठवलं, दाराला लाथ मारून घरात घुसले

लाडेगाव शिवारातील अडीच एकर शेतात पत्र्याच्या शेडमध्ये समाबाई तुकाराम लाड (वय 80) आपल्या पतीसोबत राहत होत्या.  17 जूनच्या रात्री 1 ते 2 वाजेच्या सुमारास चार चोरट्यांनी शेडबाहेर झोपलेल्या त्यांच्या पतीला शिवीगाळ करत उठवलं.

समाबाई यांनी आतून आवाज दिल्यावर एका चोरट्यानं दरवाजाला लाथ मारून आत प्रवेश केला. समाबाई यांनी “माझा मुलगा मिल्ट्रीत आहे, त्याला फोन लावते,” असं सांगितलं असता चोरट्यांनी त्यांचा मोबाईल हिसकावला आणि “दोघी लहान मुली कुठे आहेत?” अशी विचारणा केली. घाबरलेल्या समाबाई यांनी केवळ दोघेच राहत असल्याचं सांगितलं.

कानातील फूल न निघाल्यानं कान तोडले

चोरट्यांनी समाबाई यांच्या गळ्यातील 5 ग्रॅमचे मंगळसूत्र, 3 ग्रॅमची नथ, 4 ग्रॅमचे कानातील फुले आणि एक साधा मोबाईल असा 73 हजारांचा ऐवज बळजबरीने लुटला. एक कानातील फूल न निघाल्याने जबरदस्ती करताना समाबाई यांचा कान फाटून गंभीर जखम झाली. यानंतर चोरटे लोखंडी गेटवरून उड्या मारत अंबाजोगाईच्या दिशेने पायी पळून गेले. सर्वांनी चेहऱ्यावर कपडे बांधल्याने त्यांची ओळख पटली नाही. तक्रारीनुसार, दोघे सडपातळ, तर उर्वरित मध्यम बांध्याचे होते.

या प्रकरणी युसुफ वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे. जिल्ह्यातील सातत्याने घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी तपास तीव्र करून लवकरात लवकर चोरट्यांना पकडावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Our Reader

7893842
error: Content is protected !!