बीड

आठवडाभरापूर्वी कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया होऊनही राहिला सहा आठवड्याचा गर्भ ?

बीड प्रतिनिधी : एका गरोदर महिलेवर आठवडाभरापूर्वी गर्भपात आणि कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया झाल्यानंतरही तिच्या पोटात सहा आठवड्याचा गर्भ कायम राहिल्याचा प्रकार समोर आला आहे. सदर महिलेने दि. 18 बुधवारी केलेल्या सोनोग्राफीनंतर हा प्रकार समोर येत आहे.

           नेकनूर येथील एका महिलेला आठवडाभरापूर्वी बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गर्भवती असलेल्या त्या महिलेची गर्भपात आणि कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया बीडच्या जिल्हा रुग्णालयात करण्यात आली. आणि १४ जूनला सदर महिलेची दवाखान्यातून सुट्टी झाली. मात्र त्यानंतरही सदर महिलेला गर्भधारणेबद्दल शंका आल्याने महिलेच्या नातेवाईकांनी सदर महिलेच्या तपासण्या केल्या. पुणे येथे बुधवारी सदर महिलेची सोनोग्राफी करण्यात आली. यात महिलेच्या गर्भाशयात ६ आठवड्यांचा जिवंत गर्भ असल्याचे निदान करण्यात आले आहे. या प्रकारामुळे खळबळ माजली असून जिल्हा रुग्णालयात शस्त्रक्रिया नेमकी कोणती करण्यात आली हा प्रश्न निर्माण झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सदर महिलेचे यापूर्वी सीझररियन झाले होते, त्यामुळे पुढच्या प्रसूतीदरम्यान जोखीम नको म्हणून गर्भपात आणि कुटुंबकल्याण शस्त्रक्रियेचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता निर्माण झालेल्या परीस्ठीमध्ये करायचे काय हा प्रश्न उपस्थित होत आहे.

माहिती घ्यावी लागेल

गर्भपात आणि कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया एकाचवेळी केली, तर गर्भाचा काही अंश काही दिवस गर्भाशयात दिसू शकतो. मात्र तो पूर्ण गर्भ आहे का नाही हे आतच सांगता येणार नाही. आम्ही सदर महिलेस नेकनूरच्या स्त्री रुग्णालयात जाऊन तपासणी  करायला सांगितले आहे. त्या तपासणीचा अहवाल आल्यानंतरच याबद्दल भाष्य करता येईल. तो पर्यंत मी देखील या प्रकरणाची सविस्तर माहिती घेत आहे.

डॉ. संजय राऊत (जिल्हा शल्यचिकित्सक, बीड )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Our Reader

7893841
error: Content is protected !!