ध्येय निश्चित करा व ते प्राप्त करण्यास कष्ट अविरत कष्ट घ्या – डाॅ. सचिन पोतदार
अंबाजोगाई प्रतिनिधी
स्वामी विवेकानंद बाल विद्यामंदिर शाळेत दि. २७ जून रोजी इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी समुपदेशनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पौगंडावस्थेतील मुलामुलींचे अनेक प्रश्न असतात, त्यांना योग्य असे मार्गदर्शन मिळेलच असे नाही. या वयात मुलांमध्ये अनेक हार्मोनल बदल होत असतात. त्यामुळे शरीर व मनाच्या एक विचित्र कोंडीत ही मुले सापडेलेली असतात. अशा मुलांना योग्य ते मार्गदर्शन मिळावे व त्यांच्या प्रश्नांना योग्य उत्तरे मिळावीत म्हणून नवक्षितीज बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. संतोष दादा कुलकर्णी व संस्थेच्या सचिव तथा स्वामी विवेकानंद शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. स्वरुपाताई डिग्रसकर यांच्या विचारातून व मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या समुपदेशनचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास समुपदेशक म्हणून शहरातील ख्यातनाम बालरोगतज्ञ डाॅ. सचिन पोतदार हे उपस्थित होते.
“आपल्या देशात बुद्धिमान व्यक्तींची कमतरता नसून आपण देशासाठी आपल्या बुद्धिमत्तेचा वापर कसा करता येईल हे विद्यार्थ्यांनी लक्षात घेऊन आपले ध्येय ठरवले पाहिजे” असे मत कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत स्वरुपाताई डिग्रसकर यांनी मांडले. त्यानंतर डाॅ. सचिन पोतदार यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. आपले ध्येय लवकर निश्चित करुन त्याकडे मार्गक्रमण करा, व्यसनापासून दूर राहा तसेच मोबाईलचा वापर कामापुरता करा असा सल्ला त्यांनी मुलांना दिला. यावेळी मुलांनी डाॅक्टरांना उत्स्फूर्तपणे अनेक प्रश्न विचारले व आपल्या मनातील अनेक शंका-कुशंकांचे समाधान करुन घेतले.
शेवटी अध्यक्षीय भाषणात संस्थेचे अध्यक्ष श्री. संतोष दादा कुलकर्णी यांनी पौगंडावस्थेतील मुलांच्या समस्या व समुपदेशनाची गरज यावर आपले मत मांडले व मुलांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे यशस्वी सूत्रसंचालन सौ. योगिताताई मुंडे यांनी केले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी शाळेतील सर्व ताई व दादांनी परिश्रम घेतले.