*एस.टी बसला छत्रपती शिवाजी महाराज चौकात पुर्वीच्याच ठिकाणी थांबा द्या ; पोस्ट ऑफिस मध्ये कर्मचारी व काऊंटर वाढवा* *समाजवादी पार्टीचे पोलिस निरीक्षक व पोस्ट मास्टर यांना निवेदन*
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
अंबाजोगाई शहरात एस.टी बसला छत्रपती शिवाजी महाराज चौकात पुर्वीच्याच ठिकाणी थांबा द्या, तसेच पोस्ट ऑफिस मध्ये नागरिकांची वाढती गर्दी पहाता कर्मचारी व काऊंटर यांची संख्या वाढवावी अशी मागणी समाजवादी पार्टीचे प्रदेश सचिव ऍड.शिवाजी कांबळे, शहराध्यक्ष राजेश परदेशी यांनी अंबाजोगाई शहर ठाण्याचे पोलिस निरीक्षक व पोस्ट मास्टर यांना मंगळवार, दिनांक १ जुलै रोजी दिलेल्या दोन स्वतंत्र निवेदनातून केली आहे.
याबाबत आमच्या प्रतिनिधीशी बोलताना शहराध्यक्ष राजेश परदेशी यांनी सांगितले की, पोलिस निरीक्षक यांना दिलेल्या पहिल्या निवेदनात नमूद केले आहे की, समाजवादी पार्टी, अंबाजोगाई (जि.बीड) यांच्या वतीने उपजिल्हाधिकारी तसेच एस.टी.आगारप्रमुख यांना यापूर्वी दि.३० एप्रिल २०२५ रोजी निवेदन देण्यात आलेले आहे. तरी एस.टी डेपो मॅनेजरने सांगितले की, याबाबत आपण पोलीस स्टेशनला ही कळवा. म्हणून आज रोजी आम्ही आपणांस निवेदन देत आहोत. विषय असा की, पोलिस प्रशासनाने अंबाजोगाई शहरातील जिल्हा परिषद शाळेसमोर जागा उपलब्ध करून दिल्यास आम्ही एस.टी तिथे थांबवू, पुर्वी एस.टी बसेस या छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील जिल्हा परिषद शाळेसमोर थांबत होत्या. तेथेच प्रवासी बसेस मधून उतरत असत. सध्याच्या थांबामुळे रहदारी व वाहतूकीस मोठा अडथळा निर्माण होतो आहे. कारण, मोंढा रोडपासून ट्राफिक जाम होतो. मोंढा येथे दर मंगळवारी बाजार भरतो. तसेच या परिसरातच न्यायालयाकडे व स्वाराती रूग्णालयाकडे जाणारा रस्ता आहे. आणि आद्यकवी मुकुंदराज समाधी परिसराकडे जाणारा रस्ता व श्री योगेश्वरी देवी मंदीराला जाणारा रस्ता ही आहे. मोंढ्याकडून आणि स्वातंत्र्यवीर सावरकर चौकाकडून दोन्ही साईडची ट्राफीक छत्रपती शिवाजी महाराज चौक नजीक मध्यभागी एसटी बसेस थांबत असल्यामुळे जाम होते. त्यामुळे एस.टी बसला छत्रपती शिवाजी महाराज चौकात पुर्वीच्याच ठिकाणी थांबा द्यावा तसेच अंबाजोगाई येथील पोस्ट कार्यालयात फार पुर्वीपासून जेवढे कांऊटर आहेत. आज सुध्दा तेवढेच कांऊटर व कर्मचारी आहेत. वाढते शहरीकरण आणि नागरिकीकरण पहाता तसेच दिवसेंदिवस पोस्टाच्या विविध सुविधांचा लाभ घेणाऱ्या नागरिकांची संख्या ही वाढत आहे. मुलभूत सुविधा तात्काळ मिळत नाहीत. यासाठी ग्राहक तसेच जेष्ठ नागरिक यांना पोस्ट ऑफिस मध्ये गर्दीमुळे ताटकळत थांबावे लागते. बँक व्यवहारासाठी तसेच रजिस्टर पोस्ट आणि विविध कामांसाठी कांऊटर कमी असल्यामुळे खूप वेळ वाया जातो. तरी पोस्टमास्टर यांनी वरीष्ठांना याबाबत त्वरित कळवावे आणि अंबाजोगाई पोस्ट ऑफिस कार्यालयात कांऊटरची संख्या व कर्मचारी वाढविण्यात यावेत. तसे न झाल्यास अंबाजोगाई पोस्ट ऑफिससमोर अंदोलन करण्यात येईल याची संपुर्ण जबाबादारी पोस्ट मास्टर यांच्यावर राहील. असा इशारा सदरील निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. सदरील निवेदनावर समाजवादी पार्टीचे प्रदेश सचिव ऍड.शिवाजी कांबळे, अंबाजोगाई शहराध्यक्ष राजेश परदेशी, शहर उपाध्यक्ष शेख शाकेर यांच्या स्वाक्षर्या आहेत.