अंबाजोगाई (प्रतिनिधी)
माणसाला जीवनात साधनसुविधा आणि संपत्ती कितीही मिळाली तरी खऱ्या अर्थाने जन्माला घातलेली लेकरं सुसंस्कृत आणि गुणवत्तापूर्ण घडली तर तीच खरी संपत्ती समजावी. त्यासाठी शिक्षण काळात पालकांनी लेकरावर कडवी नजर ठेवण्याची गरज आहे, असे प्रतिपादन भाजपाचे प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केले.
खोलेश्वर महाविद्यालयात आयोजित पालक मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. दीपक फुलारी होते. व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ. रवींद्र कुंबेफळकर, प्रा. योगेश कुलकर्णी, प्रा. दुबे सर, प्रा. राजगुरू आदी मान्यवर उपस्थित होते. व्यवसाय अभ्यासक्रम विभागाच्या वतीने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
कुलकर्णी म्हणाले की, चंगळवादाच्या काळात मुला-मुलींनी व्यसनांच्या आहारी न जाता गुणवत्तेसाठी कठोर परिश्रम घ्यायला हवेत. मोबाईलचा वापर आवश्यक असला तरी त्याचा अतिरेकी वापर घातक ठरतो. शिक्षण काळात लेकरांच्या संगतीवर, वागणुकीवर, अभ्यासावर पालकांनी सतत लक्ष ठेवणे गरजेचे आहे. शाळा-महाविद्यालयीन शिक्षकांशी संवाद साधणे तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.विद्यार्थ्यांना उद्देशून ते म्हणाले की, “आपल्याला शिक्षणासाठी आई-वडील रोज घाम गाळून जीवाचं काबाडकष्ट करतात. त्यामुळे मिळालेल्या संधीचा योग्य उपयोग करून परिश्रम घ्या, आत्मपरीक्षण करा. गुणवत्तेच्या जोरावर जीवनात यश नक्की मिळते. राजकीय वशिल्याशिवायही नोकरी मिळवता येते.”या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. राजगुरू यांनी केले तर सौ. बर्दापूरकर मॅडम यांनी आभार मानले. मेळाव्यास 100 च्या आसपास पालक व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.