*पूरग्रस्तांना सर्वोतोपरी वैद्यकीय सेवा, मानसिक आरोग्य सेवा व मदत पुरविणार – डॉ.राजेश इंगोले*
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
मराठवाड्यामध्ये सर्वत्र वादळी पावसाने हाहाकार माजविला आहे. पडत असलेल्या प्रचंड पावसामुळे सर्वत्र पूर सदृश्य परिस्थिती आलेली आहे. जनजीवन विस्कळीत झालेले आहे. या पडत असलेल्या संततधार पावसामुळे आणि बदललेल्या वातावरणामुळे इथून पुढे विविध संसर्गजन्य रोग व रोगराई पसरण्याचा धोका आहे. या रोगराई सदृश्य परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी आणि पूरग्रस्त भागातील नागरिकांना आरोग्याची सुरक्षितता लाभावी यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशन या पूरग्रस्त भागातील नागरिकांना आरोग्यसेवा पुरविण्यास कटिबद्ध आहे. पूरग्रस्त भागातील नागरिकांना आरोग्य विषयक काहीही मार्गदर्शन किंवा गरज भासली तर स्थानिक इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्ष, सचिव व इतर पदाधिकाऱ्यांशी तात्काळ संपर्क साधावा. ते तुम्हाला वैद्यकीय सेवा पुरवतील अशी ग्वाही इंडियन मेडिकल असोसिएशनचे राज्य पदाधिकारी सांस्कृतिक समिति अध्यक्ष डॉ.राजेश इंगोले यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
त्यासाठी ज्यांना वैद्यकीय सेवेची आवश्यकता आहे अशा रूग्णांनी किंवा नातेवाईकांनी 9403775555 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधून आपले नांव, होत असलेला त्रास, आपले गाव, तालुका व जिल्हा या क्रमांकावर व्हाट्सअप करावा. संपर्क साधलेल्या सर्वांना लागलीच त्यांच्या जवळील कार्यक्षेत्रात कार्यरत असलेल्या इंडियन मेडिकल असोसिएशनच्या संलग्न पदाधिकाऱ्यांची संपर्क करून दिला जाईल व त्यांना ते आहेत तेथेच वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली जाईल असे डॉ.इंगोले यांनी यावेळी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. इंडियन मेडिकल असोसिएशन ही सर्वसामान्य जनतेच्या आरोग्य हिताशी कटिबद्ध आहे. सर्वसामान्य जनतेचे आरोग्य सुरक्षा इंडियन मेडिकल असोसिएशनचे प्राधान्यक्रम आहे. निसर्गनिर्मित या संकटामध्ये सर्वसामान्य जनतेच्या सोबत इंडियन मेडिकल असोसिएशन खांद्याला खांदा लावून उभा आहे ही ग्वाही डॉ.राजेश इंगोले यांनी यावेळी दिली. कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांची पिके आणि शेतातील मातीही वाहून गेलेली आहे त्यामुळे राज्य शासनाने शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 50 हजार रूपये आपत्कालीन मदत म्हणून जाहीर करावी अशी मागणी डॉ.राजेश इंगोले यांनी एका निवेदनाद्वारे उपविभागीय अधिकाऱ्यांना केलेली आहे. निसर्गनिर्मित या संकटामुळे बळीराजा मानसिक दृष्ट्या खचलेला आहे.झालेल्या नुकसानीमुळे तणावग्रस्त आहे. भविष्याची चिंता लागून राहिलेली आहे. या परिस्थितीमध्ये खचलेल्या या बळीराजाला मानसिक आणि आर्थिक मदतीची गरज आहे याप्रसंगी पूरग्रस्तांच्या मदतीला इतर सर्वांनी धावून जाण्याची गरज आहे. आपल्या परीने जी काही होईल ती मदत या पूरग्रस्त भागातील लोकांना सर्व दानशूर व्यक्तींनी करावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे अनेकांना ताण-तणाव येत आहेत. मनामध्ये आत्महत्येची विचार येत आहेत. परंतु ही परिस्थिती लवकरच निवळेल आणि येणाऱ्या भविष्यामध्ये आपल्याला चांगले आयुष्य मिळणार आहे ही आशा मनामध्ये पल्लवीत ठेवायची आहे.आपल्या मनामध्ये जर आत्महत्येचे विचार जास्त प्रमाणात येत असतील तर आपल्या आजूबाजूच्या मित्र परिवाराला मार्गदर्शकांना व नातेवाईकांना याबाबत सांगावे व यावर सविस्तर चर्चा करावी आणी मनमोकळे करावे असेआवाहनही त्यांनी केले. तरीही जर का हे विचार मनात सतत घोळत असतील तर 14416 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करावा. हा मोबाईल 24 तास पूरग्रस्तांना समुपदेशन आणि मानसिक ताण तणावापासून दूर ठेवण्यासाठी मार्गदर्शन करेल अशी माहिती डॉ.राजेश इंगोले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून दिली आहे.