लातूर प्रतिनिधी:–
धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गात आरक्षण मिळावे या मागणीसाठी आंदोलन करणारे कार्यकर्ते चंद्रकांत हजारे यांनी मांजरा नदीच्या पात्रात उडी मारून जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून त्यांना ताब्यात घेतले आणि पुढील अनर्थ टाळला.
आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी सरकारवर दबाव वाढवण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले.
लातूरमध्ये धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या काही काळापासून आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचे नेतृत्व चंद्रकांत हजारे आणि अनिल गोयकर करत आहेत. यापूर्वी त्यांनी याच मागणीसाठी आमरण उपोषण आणि चक्काजाम यांसारखी आंदोलनेही केली आहेत. आपल्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी जलसमाधी आंदोलनाचा निर्णय घेतला होता.
चंद्रकांत हजारे हे आपल्या सहकाऱ्यांसह मांजरा नदीच्या पुलावर जमले होते. त्यांनी धनगर समाजाच्या आरक्षणासाठी घोषणाबाजी करत नदीत उडी मारण्याचा प्रयत्न केला. परंतु, परिस्थितीवर लक्ष ठेवून असलेल्या पोलिसांनी प्रसंगावधान दाखवत हजारे यांना ताब्यात घेतले. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
पोलिसांनी हजारे यांना ताब्यात घेतल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेनंतर धनगर समाज संघटनांनी आपल्या मागण्या अधिक तीव्रतेने मांडण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. जोपर्यंत सरकार धनगर समाजाला एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
धनगर समाजाचा अनुसूचित जमातीचे तात्काळ प्रमाणपत्रवाटपकरा, ही अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. यावरून राज्यात अनेकदा आंदोलने झाली आहेत.