*वैष्णवी आडे, रेणुका अपूर्वा, प्रगती जाधव या ठरल्या फ्रीज, टिव्ही व वॉशिंग मशीनच्या मानकरी*
अंबाजोगाई (प्रतिनिधी):- प्रियदर्शनी क्रीडा व सांस्कृतिक मंडळ तसेच रोट्रॅक्ट क्लब ऑफ अंबाजोगाईच्या वतीने आयोजित अंबाजोगाई दांडिया महोत्सव-२०२५ चा समारोप मोठ्या झगमगाट व थाटामाटात सहभागी स्पर्धकांच्या मोठया हर्षोउल्हासात संपन्न झाला. या स्पर्धेच्या विजेत्या होण्याचा बहुमान वैष्णवी आडे यांनी मिळवला तर उपविजेत्या ठरल्या रेणुका अपूर्वा व प्रगती जाधव. प्रतिवर्षी प्रमाणे यावर्षीदेखील संकेत मोदी यांच्या नियोजन तथा मार्गदर्शनाखाली दि २७ सप्टेंबर ते २९ सप्टेंबर दरम्यान अंबाजोगाई शहरातील गरबा प्रेमींसाठी अंबाजोगाई दांडिया महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या दांडिया महोत्सवात शहरातील ५०० दांडिया प्रेमी स्पर्धकांनी या महोत्सवाचा लाभ घेतला. या तीन दिवसीय दांडिया महोत्सवात दररोज एक नवीन थीम सहभागी स्पर्धकांना देण्यात आली होती. यामध्ये महाराष्ट्रीयन, सिनेमा, आणि गुजराती थीमचा समावेश होता.
या तीन दिवसीय अंबाजोगाई दांडिया महोत्सव-२०२५ चा शुभारंभ शहरातील विविध मान्यवरांच्या विशेषतः महिलांच्या हस्ते करण्यात आला होता. शहरातील विविध महिलांचा सन्मान देखील या महोत्सवा दरम्यान केला गेला. दररोजच्या विजेत्या स्पर्धकांना पैठणी देण्यात येत होती. तीन दिवसीय या स्पर्धेच्या विजेत्या स्पर्धकां मधून शेवटी उत्कृष्ट जोडी, उत्कृष्ट महिला स्पर्धक त्याचबरोबर उत्कृष्ट बाल स्पर्धक अशी निवड करून विजेत्यांना बक्षिसांचे वाटप करण्यात आले.
प्रियदर्शनी क्रीडा व सांस्कृतिक मंडळ व रोट्रॅक्ट क्लब ऑफ अंबाजोगाई च्या वतीने आयोजित दांडिया महोत्सवात प्रथम क्रमांकाचे बक्षिस (डबल डोअर गोदरेजचे फ्रीज) हे वैष्णवी आडे यांना देण्यात आले. द्वितीय क्रमांक एलईडी टीव्ही साठी रेणुका अपूर्वा त्याचबरोबर प्रगती जाधव यांनी वॉशिंग मशिन जिंकत तृतीय क्रमांक पटकावला. लहान मुलींमध्ये प्रथम क्रमांक कु भक्ती दरगड हिने मिळवत सायकलच्या स्वरूपात मंडळाकडून प्रथम बक्षीस हस्तगत केले. तर कु काव्या गणेश देशमुख हिची द्वितीय क्रमांकासाठी निवड करत तिला स्मार्ट वॉच बक्षीस देण्यात आले. जोडी स्पर्धकां मध्ये ऋतुजा खोपकर व रजत जेधे यांनी प्रथम क्रमांक मिळवत टायटन कपल वॉच मिळवली . तर श्रद्धा सोमाणी व दर्शन मंत्री यांनी द्वितीय क्रमांक मिळवत चांदीचे ब्रेसलेट बक्षीस स्वरूपात मिळवले. तृतीय क्रमांक कु जेनी डागा व आदित्य लोढा यांनी रेमंड कपल गिफ्ट पॅक जिंकला. संपूर्ण दांडिया महोत्सवात या स्पर्धेची रीलस्टार म्हणून कु सिया गित्ते हिला स्मार्ट वॉच तर उत्तेजनार्थ पारितोषिक चि विरेन सचिन जाधव याला प्रोत्साहनपर पारितोषिक वितरित केल्या गेले. दांडिया महोत्सवातील स्पर्धेत विजेते स्पर्धकांची निवड करण्यासाठी लातूर येथुन क्रीडा क्षेत्रातीलच जाणकार परीक्षकांना आमंत्रित करण्यात आले होते. या परीक्षकांनी कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता अतिशय पारदर्शक पणे या दांडिया महोत्सवातील स्पर्धेचा अंतिम निकाल जाहीर केला. तर संचलन पुणे येथील कु तेजस्वी चव्हाण हिने अतिशय उत्तम प्रकारे सांभाळले.
या स्पर्धेदरम्यान आलेल्या विविध पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना राजकिशोर मोदी व संकेत मोदी यांनी दोन वर्षांपासून सुरू केलेल्या दांडिया महोत्सवाचे कौतुक करतांना अंबाजोगाई शहरातील दांडिया प्रेमींना एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे अभिनंदन व आभार व्यक्त केले. नुकत्याच संपन्न झालेल्या गणेशोत्सवात संकेत मोदी यांनी ढोलताशा स्पर्धा अतिशय उत्तम रित्या आयोजित करून अंबाजोगाई शहरातील प्राचीन संस्कृती जोपासण्याचे काम केले आहे. या ढोलताशा स्पर्धेत देखील अंबाजोगाई शहरातील गणेश मंडळाच्या ढोलताशा वाद्य पथकांनी अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला होता. यावेळी देखील विजेत्या स्पर्धकांना रु ३१०००/- ,२५०००/-, २१०००/- रोख बक्षीस देण्यात आले होते. प्रियदर्शनी क्रीडा व सांस्कृतिक मंडळ हे मागील ३५ वर्षापासून अंबाजोगाई शहरात अनेक क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रम राबविण्यात अग्रेसर राहिले आहे.