अंबाजोगाई प्रतिनिधी :- सांगलीला नेण्यासाठी ३० टन हळद दिली असता ट्रकमधील तब्बल ३७ लाख ८१ हजार रुपयांची हळद लंपास करून खोटी तक्रार दाखल करणाऱ्या ट्रक मालक आणि चालकावर अंबाजोगाई ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही घटना ३० सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत लोखंडी सावरगाव,कळंब फाटा परिसरात घडली.
प्रितेश दुर्गाप्रसाद सोनी हे छत्रपती संभाजीनगर येथील हे दुर्वा कमोडीटी प्रा. लि. या कंपनीचे संचालक असून, ते सांगली येथे हळद दळून विक्री करतात. त्यांनी दि.३० सप्टेंबर २०२५ रोजी राधा सर्वेश्वर कंपनी सोलापूरमार्फत ३० टन हळद खरेदी करून स्टार अॅग्रो वेअरहाऊस, लिंबाळा (एमआयडीसी, हिंगोली) येथून सांगलीकडे पाठवण्यासाठी ट्रक क्रमांक एमएच २६ एडी २९३५ या वाहनाद्वारे वाहतूक ठरवली होती.ट्रक मालक नदीम खान मुजाहेद खान (रा. अपना कॉर्नर, परभणी) आणि चालक सय्यद अजगर सय्यद सज्जान (रा. दर्गारोड, परभणी) यांच्याकडे माल ताब्यात देण्यात आला. मात्र, सांगलीला पोहोचण्याआधी नदीमने सोनी यांना कळवले की अंबाजोगाईजवळ कळंब फाटा येथे अज्ञात लोकांनी ट्रक लुटल्याची घटना घडली आहे. त्यानंतर सोनी घटनास्थळी पोहोचले असता ट्रकमध्ये फक्त ३० पोते शिल्लक असून उर्वरित ५७० पोते हळद गायब असल्याचे दिसून आले.चौकशीत चालक सय्यद अजगरने कबुली दिली की ट्रक कोणत्याही चोरट्यांनी चोरलेला नसून ट्रकमालक नदीम खान यांनी संगणमत करून ट्रकमधील हळद कोठेतरी विल्हेवाट लावली व पोलीस ठाण्यात खोटी तक्रार दिली.या प्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा तपास सपोनि जगताप हे करीत आहेत.