
वंचितांना आत्मविश्वास दिला – प्रा. राजपंखे
अंबाजोगाई प्रतिनिधी :-आधार माणुसकीच्या उपक्रमाने शालेय व उच्च शिक्षणातील विद्यार्थ्यांना पाठबळ देत, त्यांना आत्मविश्वास व जगण्याचे बळ दिले. मुलांच्या शिक्षणासाठी आधार देणाऱ्या या उपक्रमाची ज्योत अशीच तेवत राहो अशी अपेक्षा प्रा. डाॅ. मुकुंद राजपंखे यांनी व्यक्त केली.
यावेळी आधार माणुसकीच्या उपक्रमातील वैद्यकीय, अभियांत्रिकी, तंत्रशिक्षण, बी.एससी नर्सिंगसह विविध उच्चशिक्षण घेत असलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा भेटवस्तू देऊन सन्मान झाला.
अध्यक्षस्थानी कवी मुकुंद राजपंखे हे होते. अपर पोलीस अधिक्षक चेतना तिडके, प्रा. डाॅ. भागीरथी गिरी, ॲड. पद्मजा कल्याण लोमटे, पार्वती थोरात, संगीता नावंदर, दिपाली धनराज काळे, रागिनी आंबाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
—
सकारात्मकता व सदाचारातून आनंदी जीवन जगता येते. त्याचबरोबर स्वत:ची गरज भागली तर दुसऱ्यांना मदत करणे हीच सामाजिक बांधिलकी असल्याचे प्रतिपादन दीनदयाल बँकेच्या माजी अध्यक्षा शरयू हेबाळकर यांनी सोमवारी (दि.२०) येथे व्यक्त केले.

समाजभानाची प्रेरणा- चेतना तिडके
आधार माणुसकीच्या उपक्रमाने लोकसहभागातून वंचितांना फराळाचा आधार देत, त्यांची दिवाळी गोड केलेली आहे. अशा उपक्रमातून समाजभान निर्माण होईल असे प्रतिपादन अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांनी केले.
—
दिवाळी गोड करण्यात मुलांचा हातभार
या वंचितांची दिवाळी गोड करण्यात केज येथील गुरुकृपा शिकवणी मधील विद्यार्थ्यांनी पाच, दहा रुपये जमा करून २० हजार ८०५ रुपये गोळा करून दिले. त्यात तेवढीच रक्कम या क्लासचे संचालक
उत्तरेश्वर जाधव यांनी घालून आधार माणुसकीच्या उपक्रमाचे प्रमुख ॲड. संतोष पवार यांच्याकडे सुपूर्द केली. त्यांचे हे योगदान आत्महत्याग्रस्त शेतकरी व वंचित कुटुंबाची दिवाळी गोड करण्यासाठी कारणी लागले.
—
या प्रसंगी इतर उपस्थित महिला मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. उपक्रमातील सिया मुंदडा, प्रतिक्षा चिंचोळे,
प्रांजली गुळभिले, डाॅ. सायली कापसे व मिरा बरकते यांनी आधार माणुसकीच्या उपक्रमातून मिळत असलेल्या मदतीबाबत भावना व्यक्त केल्या.
या प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महिलांना फराळाचे किट देण्यात आले. प्रास्ताविक ॲड. संतोष पवार यांनी केले. शिवानंद गुळवे यांनी सूत्रसंचालन संचालन केले. पत्रकार प्रशांत बर्दापूरकर यांनी आभार मानले. सायली मंगल कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमास ६०० महिला व गुणवंत विद्यार्थी व विविध क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते.
