
प्रेमसंबंध संपल्यानंतर एका कुटुंबात अचानक निर्माण झालेल्या वादामुळे परिसरात मोठी चर्चा सुरू झाली आहे. नेमकं काय घडलं?
केज प्रतिनिधी :- बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात एका गावात प्रेमसंबंध संपुष्टात आल्यानंतर एका तरुणीने प्रियकराच्या घरात घुसून गैरवर्तन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी संबंधित तरुणीविरोधात युसूफवडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, या घटनेमुळे परिसरात चांगलीच चर्चा रंगली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, केज तालुक्यातील ढाकेफळ येथील एक तरुण लातूर येथे शासकीय सेवेत कार्यरत आहे. याच गावातील एका तरुणीसोबत त्याचे पूर्वीपासून मैत्रीपूर्ण संबंध होते. मात्र, नातेवाईकांच्या मध्यस्थीने दोघांमधील संबंध संपुष्टात आणण्यात आले होते. यानंतर, १४ डिसेंबर रोजी तरुणाच्या लहान भावाच्या लग्नाची सुपारी फोडण्याचा कार्यक्रम सुरू असताना, संबंधित तरुणी अचानक तरुणाच्या घरी आली आणि तिने तिथे गोंधळ घातला. उपस्थितांनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला.
नातेवाईकांच्या उपस्थितीत दोघांमधील संबंध पूर्णपणे संपल्याचे एक लेखी शपथपत्र देखील तयार करण्यात आले होते. मात्र, यानंतरही प्रकार थांबला नाही. अचानकपणे २२ डिसेंबर रोजी रात्री साडे आठच्या सुमारास ती तरुणी पुन्हा तरुणाच्या घरात घुसली आणि तिने दरवाजावर थुंकल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला आहे. तरुणाच्या वडिलांनी तिला जाब विचारला असता, तिने शिवीगाळ करत घर सोडणार नसल्याची धमकी दिली, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तसेच, गंभीर परिणामांची भाषा करत ती तिथून निघून गेली, असा आरोप संबंधित तरुणीवर करण्यात आला आहे.
