
*पत्रकार संघटनांचा तीव्र संताप; काम तात्काळ थांबवण्याची मागणी; अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलनाचा इशारा**
परळी वैजनाथ प्रतिनिधी :- राणी लक्ष्मीबाई टॉवरजवळ असलेल्या नगर परिषदेच्या शॉपिंग कॉम्प्लेक्समधील पत्रकार भवनाच्या इमारतीवर कोणतीही अधिकृत परवानगी न घेता सौर ऊर्जेचे पॅनल बसवण्याचे काम सुरू असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे शहरातील पत्रकार संघटनांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

पत्रकार भवन हे पत्रकार संघटनांच्या मालकीचे व विश्वस्तांच्या अधिपत्याखाली असताना, पत्रकार संघटना तसेच पत्रकार भवनाच्या विश्वस्तांची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता हे काम सुरू करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा प्रकार म्हणजे पत्रकारांच्या हक्कांवर थेट गदा आणण्याचा प्रयत्न असल्याचे मत पत्रकार बांधवातून व्यक्त केले जात आहे.
या संदर्भात अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न परळी पत्रकार परिषदेच्या वतीने परळी नगर परिषदेचे मुख्यअधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात सदरील काम तात्काळ थांबवावे, अशी स्पष्ट मागणी करण्यात आली असून, अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे. आंदोलन झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील, असेही निवेदनात ठामपणे नमूद करण्यात आले आहे.
या निवेदनावर मराठी पत्रकार परिषदेचे परळी तालुकाध्यक्ष धीरज जंगले, शहराध्यक्ष किरण धोंड यांच्यासह अनेक पत्रकार सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

पत्रकार भवनासंदर्भात परवानगीशिवाय सुरू असलेले हे काम तात्काळ थांबवले जाणार की प्रशासन पत्रकारांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
या प्रकरणामुळे परळी शहरात प्रशासन विरुद्ध पत्रकार असा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
