अंबाजोगाई प्रतिनिधी :
अंबाजोगाई शहरात एका २८ वर्षीय महिलेवर लग्नाचे आमिष दाखवून दोन वर्षांपासून शारीरिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून सलमान अजीज पठाण याच्याविरुद्ध फसवणूक, अत्याचार व धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी सध्या फरार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लातूर जिल्ह्यातील चाकूर येथील रहिवासी असलेली पीडित महिला सध्या अंबाजोगाई येथे वास्तव्यास आहे. आरोपीने तिला लग्नाचे आश्वासन देत दोन वर्षांपूर्वी आपल्या जाळ्यात ओढले आणि तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मात्र, विवाहाचा विषय निघताच त्याने टाळाटाळ सुरू केली.
तक्रारीनुसार, आरोपीने पीडितेवर धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकत “धर्म बदलल्याशिवाय लग्न करणार नाही” अशी अट घातली. तसेच शिवीगाळ करत “तुला जे करायचे ते कर” असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही समोर आले आहे.
या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ६९, ३५२ आणि ३५१(२) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक जाधवर पुढील तपास करत असून फरार आरोपीचा शोध सुरू आहे.
