आष्टी प्रतिनिधी : तालुक्यातील जामगाव ते ह.ना. आष्टा रोडवरील शेतातील बांधाला लावलेली आग वाऱ्यामुळे पसरल्याने, जवळच झाडाच्या सावलीत उभी केलेली एक आलिशान ‘इर्टिगा’ कार काही क्षणांत जळून खाक झाली. या भीषण घटनेत गाडीची अक्षरशः राखरांगोळी झाली असून, संबंधित वाहनधारकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जामगाव-ह.ना. आष्टा मार्गावर एका शेतकऱ्याने आपल्या शेतातील बांधावरील पालापाचोळा आणि कचरा स्वच्छ करण्यासाठी तो पेटवून दिला होता. उन्हाची तीव्रता आणि सोसाट्याचा वारा असल्यामुळे ही आग काही वेळातच नियंत्रणाबाहेर गेली. याच दरम्यान, कडक उन्हापासून बचाव व्हावा म्हणून एका वाहनधारकाने आपली पांढऱ्या रंगाची इर्टिगा गाडी रस्त्याशेजारील एका झाडाच्या सावलीत उभी केली होती.बांधावरून पसरत आलेली आग थेट गाडीपर्यंत पोहोचली. वाळलेले गवत आणि वाऱ्याच्या वेगामुळे आगीने रौद्र रूप धारण केले. गाडीने पेट घेतल्याचे लक्षात येताच आजूबाजूच्या लोकांनी धाव घेतली, मात्र आगीची तीव्रता इतकी मोठी होती की पाहता पाहता संपूर्ण गाडी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली या घटनेत गाडीचे इंजिन, टायर आणि आतील सर्व भाग पूर्णपणे जळून खाक झाले आहेत. गाडीची केवळ लोखंडी सांगाडा शिल्लक राहिला आहे. लाखो रुपयांची गाडी डोळ्यादेखत जळताना पाहून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.सध्या उन्हाचा पारा ४० अंशांच्या पार गेला असून सर्वत्र कोरडे गवत आणि पालापाचोळा साचलेला आहे. अशा परिस्थितीत शेतकरी अनेकदा मशागतीसाठी बांध पेटवतात. मात्र, वाऱ्यामुळे ही आग शेजारील पिके, ठिबक संच किंवा रस्त्यावरील वाहनांपर्यंत पोहोचून मोठे अनर्थ घडू शकतात. त्यामुळे उन्हाळ्यात बांध पेटवताना किंवा आग लावताना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
