घाटनांदूर प्रतिनिधी : ता.अंबाजोगाई येथे पट्टीवडगावात आज सकाळी साडे नऊच्या सुमारास गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली. पत्नीच्या निधनानंतर दहाव्याच्या विधीसाठी स्वयंपाक सुरू असतानाच ही दुर्घटना घडली. या आगीत दोन घरे आणि घरातील संपूर्ण संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
पट्टीवडगाव येथील रहिवासी बालासाहेब जाधव यांच्या पत्नी पार्वतीबाई जाधव यांचे (ता. १२) रोजी धुरंधर आजाराने निधन झाले होते. आज त्यांच्या निधनानंतरचा दहाव्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी सकाळपासून स्वयंपाकाची लगबग सुरू होती. सकाळी ९:३० च्या सुमारास स्वयंपाकाच्या भट्ट्याने अचानक पेट घेतला आणि काही वेळातच भट्ट्याला जोडलेल्या सिलेंडरचा मोठा स्फोट झाला.
हा स्फोट इतका भीषण होता की, ज्या माळवदाच्या घरात स्वयंपाक सुरू होता, त्या घराला तात्काळ आगीने वेढले. घराला लाकडी बांधकाम असल्याने आगीचा भडका उडाला आणि ही आग शेजारील दुसऱ्या घरापर्यंत पसरली. या भीषण आगीत दोन्ही घरातील धान्य, कपडे, भांडी आणि इतर महत्त्वाचे साहित्य जळून खाक झाले आहे.
सकाळच्या वेळी झालेल्या या मोठ्या स्फोटाच्या आवाजाने संपूर्ण गावात भीतीचे वातावरण पसरले होते. ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही, मात्र जाधव कुटुंबाचे आर्थिक आणि मानसिक नुकसान मोठे झाले आहे.
पत्नीच्या निधनाचे दुःख असतानाच, या आगीत राहते घर आणि संसार उघड्यावर पडल्याने बालासाहेब जाधव यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटना घडून पाच तास झाले असताना महसूल व पोलिस प्रशासनाने घटनास्थळाचा पंचनामा केला नाही.महसूल व पोलिस प्रशासनाने या घटनेचा तातडीने पंचनामा करून पीडित कुटुंबाला मदतीचा हात द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
घाटनांदूर: पट्टीवडगाव (ता. अंबाजोगाई) येथे गॅसच्या सिलेंडर स्फोट झाल्याने जाळून खाक झालेले घर व संसार उपयोग साहित्य
