अंबाजोगाई प्रतिनिधी :
शहरातील मोंढा मार्केट परिसरात मुख्य रस्त्यावर ट्रक उभा करून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २४ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १०.४५ ते १०.५५ वाजण्याच्या सुमारास मोंढा मार्केटजवळ (सतीश सर्विस पॉईंट समोर) यशवंतराव चव्हाण चौकाकडून येणाऱ्या मुख्य सार्वजनिक रस्त्यावर आरोपी तानाजी शेषेराव सूर्यवंशी (वय २८, रा. सावणगिरा, ता. निलंगा, जि. लातूर) याने त्याच्या ताब्यातील MH24 AU 7741 क्रमांकाचा मालवाहू ट्रक रस्त्यामध्ये उभा केला होता. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली होती.
या प्रकरणी पोलीस अंमलदार बाळासाहेब ज्ञानोबा पारवे (पो.स्टे. अंबाजोगाई शहर) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा क्रमांक १५२/२०२६ अन्वये कलम २८५ बी.एन.एस. अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, संबंधित ट्रक पोलिसांनी जप्त करून पोलीस ठाण्यात जमा केला असून, पुढील कायदेशीर कारवाई करून तो परत ताब्यात देण्यात आला आहे.
अंबाजोगाई शहर पोलिसांनी जारी केलेल्या जाहीर आवाहनानुसार, रस्त्यावर बांधकाम साहित्य टाकणे, पिण्याच्या पाण्याच्या जारच्या गाड्या उभ्या करणे किंवा विक्रीचे गाडे लावून रस्ता अडवणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार आहे. मागील तीन महिन्यांत अशा प्रकारचे १० गुन्हे दाखल करण्यात आले असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची वाहने किंवा साहित्य जप्त करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे
पोलीस प्रशासनाने व्यापाऱ्यांना आवाहन केले आहे की, मालाची चढ-उतार करताना रस्त्यावर अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच गर्दीच्या वेळेत लोडिंग- अनलोडिंग टाळावे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
