घाटनांदूर प्रतिनिधी : उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर घरातील कुलरमध्ये पाणी टाकत असताना विजेचा शॉक लागून एका २६ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी सकाळी घाटनांदूर येथे घडली. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नजीर खदीर सय्यद (वय २६) हा युवक बांधकाम मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. मंगळवारी (दि.५) सकाळी साडेआठच्या सुमारास तो नेहमीप्रमाणे कामावर जाण्याची तयारी करत होता. त्यावेळी घरातील लोखंडी कुलरमध्ये पाणी टाकत असताना अचानक कुलरमध्ये विजेचा प्रवाह उतरला आणि त्याला तीव्र शॉक बसला. शॉक लागल्याने तो जागीच खाली कोसळला.
घटनेचा आवाज ऐकून घरातील पत्नी व वडील धावून आले. त्यांनी तातडीने वीजपुरवठा बंद करून नजीरला बाहेर काढले. तत्काळ त्याला घाटनांदूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्याला पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथे हलविण्याचा सल्ला दिला. अंबाजोगाई येथील ग्रामीण रुग्णालयात तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी नजीरला मृत घोषित केले.
या दुर्दैवी घटनेमुळे सय्यद कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नजीरच्या पश्चात पत्नी, अवघ्या आठ महिन्यांची चिमुकली मुलगी आणि वृद्ध आई-वडील असा परिवार असून, कुटुंबाचा आधारस्तंभ हरपल्याने त्यांच्यावर उपजीविकेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
दरम्यान, अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी नागरिकांनी विद्युत उपकरणे वापरताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. विशेषतः कुलर, पंप, हीटर यांसारख्या उपकरणांमध्ये पाणी भरताना वीजपुरवठा बंद करणे, वायरिंगची तपासणी करणे आणि सुरक्षित साधनांचा वापर करणे आवश्यक असल्याचे तज्ञांकडून सांगितले जात आहे.
