धारूर प्रतिनिधी :
धारूर तालुक्यातील पहाडी दहिफळ परिसरात एका धक्कादायक खून प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली आहे. शरद आश्रुबा धनवे (वय ४५, रा. सोन्नाखोटा) यांचा मृतदेह गावातील एका किराणा दुकानात रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आला. या घटनेने संपूर्ण परिसर हादरला असून नातेवाईक व ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अज्ञात व्यक्ती अथवा व्यक्तींनी शरद धनवे यांचा निर्घृण खून केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र खुनामागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. घटनेची माहिती मिळताच धारूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र घुगे, पोलीस उपनिरीक्षक गिराम व पोलीस कॉन्स्टेबल कदम यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी करून पंचनामा केला.
घटनेची गंभीरता लक्षात घेऊन परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी खबरदारी घेतली. त्यानंतर पहाटे सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास मृतदेह शवविच्छेदनासाठी अंबाजोगाई येथील स्व. रा. ती. ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलवण्यात आला.
शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असून त्यानुसार तपासाची दिशा निश्चित केली जाणार आहे. सध्या धारूर पोलीस या प्रकरणाचा विविध अंगांनी तपास करत असून आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
या खळबळजनक घटनेमुळे पहाडी दहिफळ व परिसरातील नागरिकांमध्ये भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
— अशोक दळवे
संपादक, महाराष्ट्र वार्ता न्यूज
