अंबाजोगाई प्रतिनिधी ::– लग्नानंतर अवघ्या वर्षभरातच २० वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना अंबाजोगाई तालुक्यातील सायगाव येथे उघडकीस आली आहे. सतत पैशांची मागणी करत शारीरिक व मानसिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणातील फिर्यादी अब्दुल पाशामियाँ शेख (वय ४२ वर्ष, रा. न्यू काझी मोहल्ला, लातूर) यांनी आपली मुलगी सानिया हिचे लग्न २५ मे २०२५ रोजी सायगाव येथील साजेद हमेद शेख याच्याशी करून दिले होते. लग्न झाल्यानंतर काही दिवसांतच लोकांचे देणे देण्यासाठी माहेरहून ५० हजार रुपये आणण्याची मागणी सानियाकडे करण्यात आली. गरिबीची परिस्थिती असतानाही फिर्यादीने ५० हजार रुपये दिले. मात्र, त्यानंतरही सासरच्या लोकांकडून पुन्हा पैशांची मागणी करत सानियाला सतत शिवीगाळ, मारहाण व मानसिक त्रास देणे सुरूच राहिले.
सासरच्या जाचाला कंटाळून अखेर ५ जून ते ६ जून २०२६ च्या दरम्यान सानियाने सायगाव येथील राहत्या घरी लोखंडी पाईपला मफलरने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. या प्रकरणी मृत सानियाचे पती साजेद हमेद शेख, सासरे हमेद हमजामियाँ शेख, दीर वाजेद हमेद शेख, सासू जबिन हमेद शेख (सर्व रा. सायगाव, ता. अंबाजोगाई) आणि नणंद शेख आयशा फिरोज मिर्झा (रा. लातूर) यांच्या विरुद्ध बर्दापूर पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त करणे, मारहाण व हुंड्यासाठी छळ केल्याचा गुन्हा नोंदवला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर कांबळे करत आहेत. दरम्यान तीन आरोपी पकडण्यात आले असून दोन फरार आहे, तीन आरोपींना अंबाजोगाईच्या न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
