*उद्या (३१ ऑक्टोबर) सकाळी ९ वाजल्यापासून पुन्हा कारवाई; पुढील काही दिवस अतिक्रमण हटाव मोहीम सुरूचं राहणार*
*अतिक्रमणधारकांना प्रशासनाचा थेट इशारा; स्वतःहून अतिक्रमणे हटवा, अन्यथा नुकसानीला सामोरे जा!*
अंबाजोगाई प्रतिनिधी:- अंबाजोगाई शहरातील अतिक्रमण हटाव मोहिमेला आज शुक्रवार, दि. ३० ऑक्टोबर रोजी सकाळपासून सुरुवात झाली असून, उद्या शनिवार, दि. ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजल्यापासून पुन्हा धडक कारवाई करण्यात येणार आहे. शहरातील प्रमुख रस्ते, चौक, बाजारपेठा आणि सार्वजनिक जागा अतिक्रमणमुक्त करण्यासाठी प्रशासनाने मोहीम हाती घेतली आहे. ही मोहीम पुढील काही दिवस सुरू राहणार आहे अशी माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
*उद्या या प्रमुख मार्गांवर कारवाई*
शनिवार, दि. ३१ ऑक्टोबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते संत भगवानबाबा चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते यशवंतराव चव्हाण चौक, स्वाराती रुग्णालय परिसर तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक ते मांडवा रोड या मार्गांवरील अतिक्रमणे हटविण्यात येणार आहेत.अनधिकृत बांधकाम, रस्त्यावरील डबे, अनधिकृत शेड, पत्रे, हातगाड्या आणि नाल्यांवरील अतिक्रमणांवर कारवाई केली जाणार आहे.
*विविध विभागांचा सहभाग; तगडा पोलीस बंदोबस्त*
या मोहिमेत सार्वजनिक बांधकाम विभाग, अंबाजोगाई नगर परिषद, महसूल प्रशासन आणि महावितरणचे अधिकारी व कर्मचारी सहभागी होत आहेत. कारवाईदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
*अतिक्रमणधारकांना थेट इशारा!*
संबंधित व्यापारी, हातगाडीधारक आणि अतिक्रमणधारकांनी स्वतःहून अतिक्रमणे काढून घ्यावीत. अन्यथा प्रशासनाकडून थेट कारवाई करण्यात येईल. कारवाईदरम्यान होणाऱ्या नुकसानीला संबंधितांनी सामोरे जावे, असा स्पष्ट इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे. आजपासून सुरू झालेली ही मोहीम पुढील काही दिवस सुरू राहणार असून, अंबाजोगाईतील रस्ते, नाले आणि सार्वजनिक जागा अतिक्रमणमुक्त करण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
