डोक्यात कोयत्याचा वार, छातीवर दगडाने मारहाण; सात जणांविरुद्ध ॲट्रॉसिटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल
माजलगाव | प्रतिनिधी
माजलगाव शहरातील फुलेनगर परिसरातील एका तरुणावर मोगलमोहल्ला येथे जातिवाचक शिवीगाळ करीत कोयत्याने डोक्यावर वार करून जीवघेणा हल्ला केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्या सोबत असलेल्या इतर तरुणांनाही लाथाबुक्क्यांनी, काठीने व लोखंडी गजाने मारहाण करण्यात आल्याची तक्रार माजलगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. या प्रकरणी सात जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सतीश प्रविण खळगे (वय २१, रा. फुलेनगर, माजलगाव) हा मजुरी करून उदरनिर्वाह करतो. दिनांक २१ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी साडेपाच ते सहा वाजण्याच्या सुमारास तो घरी असताना फुलेनगर येथील सुमित सुजितकुमार कांबळे याचा फोन आला. मोगलमोहल्ला येथे आदित्य शिंदे याला काही तरुणांनी पकडून ठेवल्याचे त्याने सांगितले. त्यामुळे सतीश खळगे व त्याचा मावसभाऊ सूरज राणोजी टाकणखार हे दोघे मोगलमोहल्ला येथे गेले.
तेथे रफिक कादरी, तोफिक कादरी, शफिक भाई (दोस्ताना हॉटेल), रेहान कादरी, सोनू शेख, नौमान शेख आणि खदीर सय्यद हे उपस्थित असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. फिर्यादीच्या आरोपानुसार, या तरुणांना पाहताच संबंधितांनी जातिवाचक शब्द वापरून शिवीगाळ केली आणि सर्वांनी मिळून मारहाण करण्यास सुरुवात केली.
यावेळी रफिक कादरी याने हातातील कोयत्याने सतीश खळगे याच्या डोक्याच्या मागील बाजूस वार केला. त्यामुळे तो गंभीर जखमी होऊन जमिनीवर कोसळला. हा वार रफिक कादरी याने केल्याचे सूरज याने पाहिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तसेच नौमान शेख याने हातातील दगडाने सतीशच्या छातीवर मारहाण केल्याचा आरोप आहे.
दरम्यान, सतीशसोबत असलेल्या सूरज, सुमित आणि आदित्य यांनाही इतरांनी मिळून शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी, काठीने आणि लोखंडी गजाने मारहाण करून जखमी केले. एवढेच नव्हे तर पुन्हा या ठिकाणी आल्यास जीवे मारून टाकण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या घटनेनंतर जखमी तरुणांनी घटनास्थळावरून पळ काढत शासकीय रुग्णालयात उपचार घेतले. त्यानंतर २३ नोव्हेंबर २०२६ रोजी माजलगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली.
या प्रकरणी माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ०३९५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ११८(२), १९१(२), १९१(३), १९० तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ मधील कलम ३(१)(आर), ३(१)(एस) व ३(२)(व्हीए) प्रमाणे सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक अशोक आबासाहेब अनंतरे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
माजलगाव शहरात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, जातीय तेढ निर्माण करणाऱ्या तसेच कायदा हातात घेणाऱ्या प्रवृत्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.
