‘महाराष्ट्र वाहतूक पोलीस चलान अभय योजना-२०२६’ लागू; प्रलंबित ई-चलनांचा दंड भरण्याचे अंबाजोगाई शहर पोलिसांचे आवाहन
अंबाजोगाई प्रतिनिधी
वाहनधारकांसाठी दिलासादायक बातमी असून, महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने जाहीर केलेल्या ‘महाराष्ट्र वाहतूक पोलीस चलान अभय योजना-२०२६’ या योजनेची अंमलबजावणी संपूर्ण राज्यात १ डिसेंबर २०२६ पासून सुरू होणार आहे. या योजनेंतर्गत पात्र प्रलंबित ई-चलनांच्या दंडाच्या रकमेत २० टक्के सवलत देण्यात येणार आहे. त्यामुळे अनेक वाहनधारकांना थकीत दंड भरण्यास मोठा दिलासा मिळणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने २७ नोव्हेंबर २०२६ रोजी निर्गमित केलेल्या आदेशानुसार ही योजना तीन टप्प्यांत राबविण्यात येणार आहे.
तीन टप्प्यांत मिळणार सवलत
पहिला टप्पा : २१ जानेवारी २०२६ ते ३० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत जारी झालेल्या पात्र प्रलंबित ई-चलनांवर २० टक्के सूट मिळणार आहे. योजनेच्या प्रारंभापासून ३० दिवसांच्या आत दंड भरणे आवश्यक आहे.
दुसरा टप्पा : १ डिसेंबर २०२६ ते ३० नोव्हेंबर २०२७ या कालावधीत जारी होणाऱ्या पात्र ई-चलनांवर २० टक्के सवलत मिळणार आहे. मात्र, चलन जारी झाल्यापासून ४५ दिवसांच्या आत दंड भरावा लागणार आहे.
तिसरा टप्पा : ३० जानेवारी २०१९ ते २० जानेवारी २०२६ या कालावधीतील सक्षम किंवा आभासी न्यायालयात प्रलंबित असलेल्या पात्र चलनांवरही २० टक्के सवलत देण्यात येणार आहे. यासाठी योजनेच्या प्रारंभापासून ३० दिवसांच्या आत दंड भरणे आवश्यक आहे.

या चलनांना मिळणार नाही योजनेचा लाभ
या योजनेचा लाभ केवळ महाराष्ट्र वाहतूक पोलीस किंवा वाहतूक कामकाज सोपविण्यात आलेल्या पोलीस यंत्रणेकडून जारी करण्यात आलेल्या तडजोडपात्र चलनांनाच मिळणार आहे. विना-तडजोडपात्र गुन्ह्यांचा समावेश असलेली चलने, परिवहन विभागाने जारी केलेली चलने तसेच यापूर्वीच भरलेली, रद्द किंवा निकाली निघालेली चलने या सवलतीसाठी पात्र राहणार नाहीत.
दंडाची रक्कम ऑनलाइन ई-चलन पोर्टलवर किंवा वाहतूक पोलीस विभागात रोखीने भरता येणार आहे. न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणांमध्ये न्यायालयाच्या आदेशानुसार व परवानगीने तडजोड करता येणार आहे.
मुदतीनंतर पूर्ण दंड वसूल होणार
योजनेचा कालावधी संपल्यानंतर थकीत दंड पूर्ण दराने वसूल करण्यात येणार आहे. वारंवार वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांविरुद्ध वाहन परवाना निलंबन, वाहन व्यवहारांवर प्रतिबंध किंवा वाहन जप्ती यांसारखी कायदेशीर कारवाई होऊ शकते.
अंबाजोगाई शहर पोलिसांचे वाहनधारकांना आवाहन
अंबाजोगाई शहर व परिसरातील सर्व वाहनधारकांनी आपल्या वाहनांवरील प्रलंबित ई-चलनांची तपासणी करून शासनाच्या या अभय योजनेचा लाभ घ्यावा. पात्र ई-चलनांचा दंड विहित मुदतीत भरून पोलीस प्रशासनास सहकार्य करावे. तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन टाळून स्वतःसह इतरांचाही प्रवास सुरक्षित करावा, असे आवाहन बीड पोलीस व अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात आले आहे.
वाहतूक नियमांचे पालन करा… सुरक्षित प्रवास करा!
सौजन्य : बीड पोलीस, अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशन
