‘ बेसलेस ‘ राजकारण संपवण्यासाठी समाजहीत साधणाऱ्या व्यक्तीला विजयी करा-इंजि.रोहिदास मस्के
—————————————-
आपल्या उमेदवारास काय वाटते ?
—————————————-
▪️ संपादक:- अशोक दळवे▪️
महाराष्ट्रात व केज मतदारसंघात सध्या ‘बेसलेस ‘ राजकारण झाले असून सामान्य जणांचे लक्ष हे मूळ प्रश्नापासून दुसरीकडे न्यायचे आणि सामान्यांना झुलवत ठेवायचे ही राजनीति उखडून टाकण्यासाठी केज मतदारसंघातील मतदारांनी सुसंस्कृत, उच्चविद्याभूषित आणि समाजहित साधणाऱ्या व्यक्तीलाच विजयी करावे असे आवाहन केज विधानसभा मतदारसंघातील रहिवासी तथा महापारेषण चे तत्कालीन कार्यकारी संचालक इंजि.रोहिदास मस्के यांनी केले आहे.
. केज येथे माध्यम प्रतिनिधीशी बोलताना इंजि.रोहिदास मस्के म्हणाले की, राज्याच्या राजकारणात सध्या गढूळ वातावरण निर्माण झाले आहे. सत्ताधारी हे सामान्य माणसांचे प्रश्न सोडवण्यासाठी असतात पण महाराष्ट्रात मतदारांना जातीपातीची, धर्माची आणि भडकाउपणाची अफूची गोळी देऊन मतदारांना गुंगीत आणि संघर्षात ठेवले जात आहे. याचा परिणाम थेट सामान्य माणसाच्या कुटुंबावर व त्याच्या सार्वजनिक जीवनावर होत आहे. गरीब-श्रीमंतीची दरी निर्माण होऊन सामान्य माणसाचे शोषण सुरू आहे. शासनकर्त्यांनी आपण शासनकर्ते आहोत हेच विसरले आहेत. त्यामुळे मतदारांनी दक्ष आणि जागे होण्याची वेळ आली आहे.केज मतदार मतदार संघ अनुसुचीत जाती साठी आरक्षित झाल्या पासुन कोणता विकास झाला आहे. मतदार संघ सर्वांग संपन्न बनणे अपेक्षित होते.
या मतदारसंघाचा मी भूमिपुत्र आहे.अत्यंत गरीबीतुन शालेय शिक्षण टाकळी गावात आणि केज येथे झाले आहे तर महाविद्यालयीन शिक्षण हे अंबाजोगाईत झाले आहे. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे येथे अभियांत्रिकीची मास्टर्स पदवी घेऊन राज्य सरकारच्या अभियांत्रिकी महाविद्यालय व महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात गेली 32 वर्ष सेवा करण्याचे काम केले आहे. नोकरीच्या निमित्ताने राज्यभर काम करण्याची संधी मिळाली. काही मतदारसंघ विकासाच्या बाबतीत सरस आहेत हे अनुभवता आले.अभियंता पासून सुरू झालेला प्रवास कार्यकारी संचालक पदापर्यंत येऊन ठेपला. विकासाच्या बाबतीत पूर्ण अभ्यास करून ही निवडणूक आपण पूर्ण इर्षेने आणि ताकदीने लढवणार आहोत. माझी उमेदवारी ही सामान्य माणसाने जाहीर केलेली उमेदवारी आहे. मतदारसंघात गेली वर्षानुवर्ष जे प्रश्न खितपत पडलेले आहेत त्या प्रश्नाला न्याय मिळावा म्हणून माझी उमेदवारी आहे. केज मतदारसंघात आजवर एक तरी उद्योग उभारता आला आहे का?किंवा साधी औद्योगिक वसाहत उभारता आली नाही? विकासाच्या बाबतीत मोठी उदासीनता दिसून येते. मूळ प्रश्नापासून सामान्य माणसाची माथी भडकवण्याचा प्रयत्न जोरात सुरू आहे. ‘ बेसलेस ‘ राजकारणामुळे सामान्य माणूस संपवण्याची राजनीती आहे. गेल्या ७५ वर्षात ऊस तोडीचा जिल्हा ही ओळख आपण मिटू शकलो नाही? हे सत्ताधाऱ्यांचे अपयश आहे. प्रशासक व उत्कृष्ट अभियंता म्हणुन आपण काम केले असून त्याचा उपयोग या भागात करणार असल्याचे सांगत आपण पंचसूत्रीवर काम करणार असल्याचे इंजि. रोहिदास मस्के म्हणाले.ज्यामध्ये मुबलक पाणी, दर्जेदार व भरपूर वीज, गुणवत्तापूर्ण शिक्षण, उत्कृष्ट आरोग्य सेवा आणि बेरोजगारांच्या हाताला काम ही पंचसूत्री सामान्य जणांच्या हिताची असणार आहे. आज अंबाजोगाई शहर असेल, केज शहर असेल ही मोठी झाली आहेत. पण त्यांना मूलभूत सुविधा मिळत नाहीत ही मोठी शोकांतिका आहे. रस्ते विकास झाला पण सामान्यांच्या दारिद्र्याचे काय? असे अनेक प्रश्न आहेत.जे वर्षानुवर्ष तसेच आहेत. याचे उत्तर समाजाला मिळण्याची गरज आहे. मतदारांनी सुद्धा यावेळी विचार करण्याची गरज आहे.क्षणिक सुख आणि घडीभरची गरज पुरवणाऱ्यापेक्षा आपल्या पिढीचे कोण कल्याण करू शकतो याला विजयी करावे व त्यालाच नेतृत्व करण्याची संधी द्यावी असे आवाहन इंजि.रोहिदास मस्के यांनी केले आहे.