गोव्यातील ज्येष्ठांच्या सत्कार समारंभाच्या अध्यक्षपदी शेपवाडीचा हिरा
(अंबाजोगाई-प्रतिनिधी):- गोवा येथे ज्येष्ठ नागरिक मंचाच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात येत आहे. या ज्येष्ठांच्या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमास महाराष्ट्रातील DK Patil तथा दिनकर शेप-पाटील अध्यक्ष स्थान भुषवणार असल्याने मौजे शेपवाडीकरांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
गोव्यातील श्री.सदाशिव रेडकर यांच्या निवासस्थानी दि. 1 ऑक्टोबर रोजी दुपारी 4:30 वाजता गोव्यातील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार समारंभ आयोजित केला आहे. त्या कार्यक्रमासाठी सुप्रसिद्ध उद्योजक तथा बिल्डर डी.के.पाटील अध्यक्षपदी दिसणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून तिवरे-वरगाव ग्रामपंचायतीचे सरपंच जयेश नाईक उपस्थित राहणार आहेत.
यावेळी सुरेखा सुरेंद्र नाईक, आनंद रमाकांत गावकर, किशोर दुर्गया होनावारकर, नंदकिशोर यशवंत मराठे, रश्मी रमेश फडते, शिवाजी गोपाळ देसाई या ज्येष्ठ नागरिक तथा मान्यवरांचा हस्ते सत्कारमूर्ती असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात येईल.
महाराष्ट्र राज्यातील बीड जिल्ह्यातील शेपवाडी गावचे रहिवासी असलेल्या अतिशय सर्वसामान्य कुटुंबातील एक सर्वसामान्य युवकाने 40 वर्षांपूर्वी गाव सोडले आणि मग अंबाजोगाई-किनवट व्हाया देशातील सर्वात मोठे पर्यटन स्थळ म्हणून परिचित असलेल्या गोवा या ठिकाणी स्थायिक झाले. केवळ गाठीला एक शून्य घेऊन आपली वाडी (गाव) सोडलेल्या दिनकर शेप-पाटील यांच्या गाठीशी (संपत्तीत) आता कितीतरी शून्य आहेत. ईतके शुन्य सोबत घेऊन गोव्यासारख्या राज्यात आपले वेगळे साम्राज्य निर्माण केलेले डी.के. पाटील अलीकडे सातत्याने गोव्यातील अनेक कार्यक्रमास कधी अध्यक्ष म्हणून तर कधी प्रमुख पाहुणे म्हणून, कधी प्रमुख उपस्थिती म्हणून आपले स्थान निर्माण करून आहेत. त्यांचे हे वैभव साम्राज्य पाहून शेपवाडीकरांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. विशेष म्हणजे शेपवाडी गावातील हा अत्यंत साधा माणूस आज एवढ्या मोठ्या उंचीवर असतानाही आपल्या गावाचा, गावातील व्यक्तींचा, मित्रांचा यत्किंचितही विसर न पडू देता तब्बल 800 किलोमीटर अंतरावरुनही आपल्या माणसांवर लक्ष ठेवून असतो. गावातील प्रत्येक सुख-दु:खाला उपस्थित असतो. तसेच गावातील विविध कार्यक्रमांना अगदी भरीव देणगी देतो. गावातील अत्यंत गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना, आणि मुलींच्या विवाहासाठी सुद्धा मोठी मदत करतो.
*भुमी पुत्राचा सत्कार शेपवाडीकर करणार का……?*
•••••••••••••••••••••••••••••••••••••••
ईतकी गगनभरारी मारत आभाळा एवढी उंची गाठूनही आपले पाय जमिनीवर ठेवून असलेल्या या भूमिपुत्रांचा नागरी सत्कार शेपवाडी ग्रामस्थ कधी करतील…..?? असाही प्रश्न आमच्या प्रतिनिधीशी बोलताना गावातील अनेकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर विचारला आहे. तेंव्हा गाव पातळीवरील राजकारण बाजूला ठेवून आपल्या गावातील या उल्लेखनीय व्यक्तिमत्त्वाचा सत्कार शेपवाडीकर नक्की करतील का…..??? हे पाहणे आता औत्सुक्याचे आहे…….!