शुक्रवार दि ४ रोजी अंबाजोगाई पिपल्स बँकेच्या सहकार क्षेत्रातील पहिल्या कॅश भरणे व काढणे (CDM) मशीनचा लोकार्पण सोहळा
अंबाजोगाई (प्रतिनिधी):- अंबाजोगाई पिपल्स बँकेच्या सहकार क्षेत्रातील मराठवाड्यातील पहिल्या कॅश भरणे व काढणे (CDM ) मशीनचा लोकार्पण सोहळा शुक्रवार दि ४ रोजी सायंकाळी पाच वाजता विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार असल्याची माहिती बँकेचे संस्थापक राजकिशोर मोदी यांनी दिली आहे. अनेक नॅशनल बँकेत आपण अशा मशिनद्वारे आर्थिक व्यवहार केले आहेत पण सहकार क्षेत्रातील नागरी सहकारी बँकेच्या कोणत्याही शाखेत अशा मशीनची व्यवस्था नव्हती . त्यामुळे ग्राहकांना पैसे भरणे किंवा पैसे काढणे यासाठी लाईनमध्ये ताटकळत उभा रहावे लागत आहे. मात्र आता अंबाजोगाई पिपल्स को ऑप बँकेच्या मुख्य शाखेत CDM मशीन उपलब्ध करून देण्यात येत आहे. यामुळे बँकेच्या ग्राहकांना याचा मोठा फायदाच होणार आहे.
बँकेच्या या मशिनद्वारे अंबाजोगाई पिपल्स बँकेच्या सर्व ग्राहकांना १००,२००,व ५०० रुपयांच्या नोटाद्वारे आपली रक्कम भरता येणार आहेत. तर पैसे काढण्यासाठी इतर कुठल्याही बँकेचे ATM कार्ड या CDM मशीनमध्ये चालणार असल्याचे बँकेचे संस्थापक अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी सांगितले. अंबाजोगाई पिपल्स को ऑप बँक ही ग्राहकांच्या अत्यंत जिव्हाळ्याची बँक म्हणून गणल्या जाते . अंबाजोगाई पिपल्स बँकेने ५५० कोटींचा टप्पा गाठत नुकतेच पुणे जिल्हा सहकारी बँक असोसिएशनच्या वतीने शुन्य टक्के एन पी ए पुरस्कार बँकेस प्राप्त झाला आहे.
अंबाजोगाई पिपल्स बँक ही आज अठरा शाखांच्या द्वारे ग्राहकांना सेवा पुरवीत आहे . नुकत्याच आणखी दोन नवीन शाखां रिझर्व्ह बँकेने मान्यतेनुसार अंबाजोगाई (चौसाळकर कॉलनी) व छत्रपती संभाजी नगर (सातारा परिसर) येथे सुरू केल्या आहेत. यापुढे परळी , केज, बनसारोळा, सोनपेठ, पुणे (पिंपरी चिंचवड) व मुंबई याठिकाणी सुद्धा बँकेच्या शाखा सुरू करण्याचा मानस असल्याचे राजकिशोर मोदी यांनी सांगितले. तसेच बँकेने IT क्षेत्रात देखील ग्राहकांना तात्काळ सेवा उपलब्ध होण्यासाठी भरीव अशी कामगिरी केली आहे.डिजिटल बँकिंग च्या माध्यमातून UPI, IMPS, RTGS द्वारे ग्राहकांना उत्तम सेवा देण्यासाठी बँक सदैव प्रयत्नशील असल्याने राजकिशोर मोदी यांनी यावेळी नमूद केले. शुक्रवारी होणाऱ्या या लोकार्पण सोहळ्यास बँकेच्या सर्व ग्राहकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थापक राजकिशोर मोदी, उपाध्यक्ष प्रकाश सोळंकी, संचालक प्रा. वसंत चव्हाण,ऍड विष्णुपंत सोळंके, पुरुषोत्तम चोकडा, अरुण काळे, ऍड सुधाकर कऱ्हाड, शेख दगडू शेख दावल ,सुधाकर विडेकर, प्रकाश लखेरा, सुरेश मोदी, हर्षवर्धन वडमारे,संकेत मोदी, वनमाला रेड्डी, स्नेहा हिवरेकर, सचिन बेंबडे, लक्ष्मण दासूद, तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी धनंजय देशपांडे यांनी केले आहे.